बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान कायम त्याच्या विशिष्ट धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. प्रत्येक गोष्टीमधील बारकावे आणि खाचखळगे जाणत पुढची चाल करणारा आमिर बॉलिवूडप्रमाणेच समाजकार्यातही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्याच्या याच समाजवावरामुळे त्याचा राजकीय वर्तुळातही वावर वाढला आहे. याच राजकारणाविषयी त्याने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच मत मांडलं आहे.

‘मला समाजकार्य करायला आवडतं त्यामुळे मी समाजकार्यात स्वत:ला वाहून घेतलं आहे. हे काम करत असताना माझ्या राजकीय नेत्यांबरोबर भेटीगाठी होत असतात. त्यामुळे या भेटीमागे मला राजकारणात प्रवेश करायचा आहे, असा अर्थ होत नाही. मला राजकारणात कधीच प्रवेश करायचा नाहीये, असं आमिर म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘मी एक समाजसेवक आहे. कोणता नेता नाही. त्यामुळे मला राजकारणात जाण्यात रस नाही. सत्ता मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या राजकारणाची मला भिती वाटते. मी एक कलाकार आहे आणि माझ्यातील अभिनय लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचं मनोरंजन करणे हेच माझं काम आहे. त्यामुळे मी राजकारणापासून चार हात लांबच बरा आहे’.

दरम्यान, आमिर सध्या त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.