ओमंग कुमार दिग्दर्शित ‘भूमी’ या आगामी चित्रपटाने संजय दत्त बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतोय. आपल्या ‘खलनायक’ अंदाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा अभिनेता एका पित्याच्या भूमिकेत दिसणार असून, आदिती राव हैदरी त्याच्या मुलीची भूमिकेत आहे. दरम्यान, चित्रपटसृष्टीत पुन्हा जम बसवू पाहणाऱ्या संजयला आपल्या चित्रपटाकडून काय हवेय, हे चांगलेच माहितीये. ‘भूमी’ची कथाच त्याचा मुख्य हिरो असे समजणाऱ्या संजूबाबाला कोणत्याही चित्रपटाच्या संहितेत दम असणे गरजेचे असते, असे वाटते.

वाचा : एमएमएस ते मुलाचं नाव, ‘या’ कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती करिना

सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार हे पन्नाशी झालेले अभिनेते अजूनही त्यांच्यापेक्षा कितीतरी वयाने लहान असणाऱ्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसतात. मात्र, संजूबाबाने असे न करता ‘भूमी’मध्ये वडिलांची भूमिका साकारली आहे. त्याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला की, ‘मिशन कश्मीर’मध्ये मी हृतिकच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मला दिल्या जाणाऱ्या भूमिका आणि चित्रपटाच्या कथेवर माझी निवड अवलंबून असते. कथेने प्रभावित झाल्यामुळेच मी ही भूमिका स्वीकारली. माझ्यासाठी आजही संहिता अधिक महत्त्वाची आहे. मुख्य म्हणजे, इलियाना डिक्रुझसोबत डान्स करायला मी काही वरुण धवन नाही. माझं आता वय झालं असून, मी कॉलेज विद्यार्थ्याची भूमिका साकारणे योग्य दिसणार नाही. ते हास्यास्पद दिसेल. आयुष्यात पुढे जाऊन योग्य भूमिका आणि चित्रपटाची निवड करणे गरजेचे असते.

वाचा : व्यसनमुक्तीसाठी गेलेला कपिल शर्मा अवघ्या १२ दिवसांत परतला

संजूबाबाने आजवर अनेक कलाकारांसोबत काम केलंय. त्यापैकी अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता गोविंदा हे त्याचे सर्वात चांगले सहकलाकार असल्याचा तसेच त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही असा खुलासाही त्याने यावेळी केला.

संजयने अनेक चित्रपटांमध्ये रोमॅण्टिक हिरोची भूमिका साकारलीय. त्याचसोबत तो ‘खलनायक’ आणि ‘अग्निपथ’ या चित्रपटांमध्ये ग्रे शेड भूमिकेत दिसला. यापैकी त्याला कोणती भूमिका आवडली असे विचारले असता तो म्हणाला की, ‘खलनायक’ साकारण्यापेक्षा मला ‘नायका’ची भूमिका अधिक आवडते.