तरुणांनी सनी लिओनीकडून प्रेरणा घेऊ नये, असे मत गीतकार प्रसून जोशीने व्यक्त केल्यानंतर सनी लिओनीने आपण प्रसून जोशी यांना ओळखत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सनी लिओनीच्या भूतकाळातील पेशाबद्दल मला आदर वाटत नाही. तरुणांनी तिच्याकडून प्रेरणा घेऊ नये, असे मत प्रसून जोशीने व्यक्त केले होते. प्रसूनच्या या वक्तव्याची माहिती सनी लिओनीला दिली असता आपण प्रसून जोशींना ओळखत नसल्याचे तिने सांगितले. प्रसून जोशी कोण आहेत हे मला माहिती नाही. गुगलवरून माहिती मिळवल्यानंतर मी यावर प्रतिक्रिया देईन, असे सनी म्हणाली. मुंबईतील एका सुप्रसिद्ध स्टोअरच्या उदघाटनाला ती उपस्थित होती.

‘सनी लिओनीच्या भूतकाळाबद्दल आदर वाटत नाही, तिच्याकडून प्रेरणा घेऊ नये’

दरम्यान, ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गीतकार प्रसून जोशी, अभिनेता आमीर खान उपस्थित होते. यावेळी पत्रकारांकडून आमीर खानला सनी लिओनीसंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा आमीरने मला सनीबरोबर काम करायला आवडेल, असे उत्तर दिले. मात्र, त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रसून जोशीने विचारणा झाली नसतानाही सनी लिओनी आणि तिच्या पॉर्न विश्वातील भूतकाळाविषयी मतप्रदर्शन केले. मी सनीच्या भूतकाळातील पेशाचा आदर करत नाही. कुणीही त्याचे अनुकरण करू नये, असे मला वाटते. मात्र, त्यामुळे मी तिचा अनादर करणार नाही. माझी संस्कृती मला तसे करू देणार नाही, असे यावेळी प्रसूनने म्हटले.