सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. पण, गेले काही दिवस प्रियांका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होती. ‘कॉन्ड नास्ट ट्रॅव्हलर’ या मासिकात ती झळकली होती. मासिकाच्या मुखपृष्टावर छापून आलेल्या फोटोमध्ये प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा टि शर्ट परिधान केल्याचे दिसते. या टी-शर्टवर लिहिलेल्या ‘रेफ्यूजी’, ‘इमिग्रेशन’, ‘आउटसाइडर’, ‘ट्रॅव्हलर’ असे चार शब्द लिहिलेले आहेत. या चार शब्दांमधील तीन शब्दांवर लाल रंगाने खोडले असून ‘ट्रॅव्हलर’ या शब्दाला तसेच ठेवण्यात आले आहे. या चार शब्दांचा अर्थ लावला तर पहिला शब्द निर्वासित, दुसरा शब्द अप्रवासी आणि तिसरा शब्द बाहेरुन आलेला असा होतो. तर छेडछाड न करता ट्रॅव्हलर हा शब्द तसाच ठेवण्यात आला असून, त्याचा अर्थ इकडे तिकडे भटकत राहणारा अर्थात प्रवासी असा होता. यामुळे प्रियांकाला सोशल मीडियावर अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागत होते. काहीजणांनी तर प्रियांकाला असंवेदनशीलही म्हटले होते.
या टीका पाहता प्रियांकाने याप्रकरणी प्रियांकाने तिचे मौन सोडले आहे. ‘माझ्या या फोटोमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांची मी माफी मागते. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. त्या टी शर्टवर लिहिलेल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला होता’, असे प्रियांका म्हणाली. प्रियांका आधी सदर प्रकरणी या मासिकानेही त्यांची बाजू मांडत ‘आम्ही फक्त परदेशी व्यक्तींसाठी इतरांच्या मनात असणारी रागाची भावना कशी कमी करता येईल याबाबतचा एक लहानसा प्रयत्न केला होता. कामाच्या निमित्ताने सीमा ओलांडणाऱ्या शरणार्थींची आणि अप्रवासींची भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता’, असे या मासिकातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान सध्या प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेतील ‘क्वांटिको २’ मालिकेच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. अमेरिकेतील लोकप्रिय मालिका असणाऱ्या ‘क्वांटिको’मुळे प्रियांकाने हॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. या मालिकेतील दुसऱ्या भागात प्रियांका एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. ‘क्वांटिको’नंतर प्रियांका ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटातही झळकणार आहे.