आतापर्यंत तुम्ही शाहरुख, सलमान एवढेच काय तर बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना स्त्री वेशात पाहिले असेल. या यादीत आता अजून एक नाव जोडलं जाणार आहे ते म्हणजे इरफान खान. इरफानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोत इरफानने लेहेंगा- ओढणी घातलेली दिसत आहे.

इरफान त्याचा आगामी ‘हिंदी मीडियम’ या सिनेमासाठी फार मेहनत घेताना दिसतोय. या सिनेमात तो एक कपड्यांच्या दुकानाचा मालक दाखवण्यात आला आहे. एका दृश्याचे चित्रिकरण करतानाचा इरफानचा हा फोटो व्हायरल झाला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार इरफानला साडी नेसण्यासाठी तासन् तास लागायचे.

दिल्लीतील चांदनी चौक परिसरात राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याची उच्चभ्रू समाजात राहण्यासाठीची तगमग आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर आधारित कथानक ‘हिंदी मीडियम’ या सिनेमाद्वारे साकारण्यात आले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन साकेत चौधरी यांनी केले असून, नेहमीच लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या इरफानची याची मुख्य भूमिका आहे. ‘हिंदी मीडियम’ या सिनेमातून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

hindi-medium-2

hindi-medium

सबाने याआधी काही सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. पण भारतातील सध्याचे वातावरण पाहता पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या या सिनेमाचे भवितव्य काय असेल याबद्दलच्या चर्चा सध्या रंगताहेत. रोमॅण्टिक कॉमेडी प्रकारात मोडणाऱ्या या सिनेमाचे सर्वाधिक चित्रिकरण दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या नजरेतून दिल्लीची झलक पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.