हिंदी चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या सुवर्णमय इतिहासामध्ये निर्माते, दिग्दर्शकांपासून ते अगदी कलाकार, संगीतकारांच्या जोड्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान दिले आहे. चित्रपटसृष्टीमध्ये प्रत्येक कलाकाराचे योगदान तसे फारच महत्त्वाचे आहे यात शंकाच नाही. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर. बॉलिवूडमधील सलीम-जावेद या जोडीतील जावेद म्हणजेच जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस आहे. आज जावेद अख्तर यांनी वयाच्या ७२ व्या वर्षात पदार्पण केले असून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावरही सर्वजण शुभेच्छा देत आहेत.
जावेद अख्तर यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जावेद अख्तर यांच्या नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय आणि त्यांना मिळालेले यश आणि त्यांच्या जीवनातील काही रोचक किस्से तुम्हाला माहित आहेत का?

जावेद अख्तर यांचे खरे नाव जादू असे आहे. त्यांचे वडील जाँ निसार अख्तर एक प्रख्यात उर्दू शायर आणि गीतकार होते. त्यामुळे जावेद अख्तर यांना शब्दसंपत्ती आणि गीतकाराच्या कलेचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला होता असे म्हणायला हरकत नाही.

जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हनी इरानी असे आहे. त्यासुद्धा पटकथा लेखक आहेत. हनी इरानी आणि जावेद अख्तर यांनी १९७२ मध्ये लग्न केले होते. पण, १९७८ पासून त्यांच्या नात्यात काही कारणास्तव दुरावा आला आणि शेवटी १९८५ मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेत आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. त्यानंतर १९८४ मध्ये जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबत लग्न केले.

१९६४ मध्ये जावेद अख्तर मुंबईत आले. त्यांच्या वडिलांसोबतचे त्यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. त्यामुळे वडिल एक प्रसिद्ध गीतकार असूनही जावेद अख्तर यांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची ओळख बनविण्यासाठी वडिलांची मदत घेतली नाही. १९७१ साली आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटाची पटकथा सलीम खान यांच्यासोबत लिहिण्याचा काळ येइपर्यंत जावेद अख्तर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. रस्त्यावर, झाडाखाली किंवा कोणा एका इमारतीच्या आवारात जावेद अख्तर यांनी सुरुवातीच्या काळात आसरा शोधला. त्यानंतर कमाल अमरोही यांच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या राहण्याची सोय झाली.

वाचा: जावेद अख्तर यांच्यामुळेच ‘मि. इंडिया’च्या करिअरला कलाटणी..

सलीम-जावेद या जोडीने लिहिलेल्या पटकथांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सलीम खान आणि जावेद अख्तर यांची पहिली ओळख एस. एम. सागर यांच्या ‘सरहदी लुटेरा’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी झाली होती. त्यावेळी सलीम खान या चित्रपटामध्ये अभिनय करत होते. तर, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जावेद अख्तर ‘क्लॅपर बॉय’चे काम करत होते. एक दिवस चित्रपटाचे संवाद लेखक सेटवर काही कारणास्तव पोहोचले नाहीत त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ‘क्लॅपर बॉय’चे काम करणाऱ्या जावेद अख्तर यांना चित्रपटातील संवाद लिहिण्यास सांगितले. एस. एम. सागर यांना जावेद अख्तर यांचे संवाद इतके जास्त आवडले की चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी थेट जावेद अख्तर यांनाच प्राधान्य दिले. याच चित्रपटाच्या सेटवर जावेद अख्तर आणि सलीम खान यांची ओळख झाली. आणि बघता बघता सलीम- जावेद ही जोडी नावारुपास आली. या जोडीने आजवर २४ चित्रपटांसाठी एकत्र योगदान दिले आहे. त्यापैकीच काही गाजलेले चित्रपट म्हणजे ‘जंजिर’, ‘दीवार’, ‘डॉन’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘मिस्टर इंडिया’.

पटकथा लेखक म्हणून आपली ओळख प्रस्थापित केल्यानंतर जावेद अख्तर यांनी १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’ या चित्रपटातून गीतकार म्हणून एक नवी ओळख मिळवली. जावेद अख्तर उर्दूत शायरी करायचे, त्यावेळी त्यांची शायरी आणि कविता यश चोप्रा यांनी ऐकल्या होत्या. त्यामुळे गीतकार म्हणूनही जावेद अख्तर यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यश मिळविले. आजवर जावेद अख्तर यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.