बॅालिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि राजकीय नेत्या जया बच्चन यांना सर्वोत्कृष्ट संसदीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर कुटुंबाकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. ट्विटरच्या माध्यमातून बिग बींनी जया बच्चन यांचे अभिनंदन करत सर्वोत्कृष्ट संसदीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि हा आमच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले. त्यांनी बुधवारी रात्री आपल्या पत्नीचा विज्ञान भवनातील फोटोदेखील ट्विटसोबत शेअर केला. हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे, असे देखील त्यांनी ट्विटमध्ये लिहिले.

वाचा : रंजनासारखी अभिनेत्री होणं नाही- अशोक सराफ

‘जयाला आज सर्वोत्कृष्ट संसदीय पुरस्कार मिळाला. हा आमच्या कुटुंबासाठी एक अभिमानाचा क्षण असून, मी तिचे अभिनंदन करु इच्छितो,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यानंतर मुलगा अभिषेक बच्चन यानेदेखील इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या आईचे अभिनंदन केले आणि हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे कॅप्शन त्याने फोटोला दिले.

जया बच्चन यांनी भारतीय संसदेत स्वतःला सिद्ध केल्याचं अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. त्यांनी लिहिलं की, जया आज सर्वोत्कृष्ट संसदीय पुरस्काराची मानकरी ठरली. यापेक्षा कोणताही मोठा क्षण आमच्या कुटुंबासाठी अभिमानाचा असू शकत नाही. संसदेत आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे आणि नेहमी उपस्थिती लावल्यामुळे ती या पुरस्कारासाठी पात्र ठरली आहे. कोणत्याही प्रकारचे काम विश्वास आणि प्रामाणिकतेच्या जोरावर केल्यास तुम्हाला स्पष्टीकरणाची गरज भासत नाही किंवा त्याचा तुम्हाला गवगवा करावा लागत नाही. तुम्ही केलेल्या कामातून ते आपोआप स्पष्ट होते आणि तुमची किंमत सर्वांना आपणहून समजते, असेही त्यांनी लिहिलं.

वाचा : आत्महत्येच्या बातमीवर फोटो लावणाऱ्या वेब पोर्टलला मोनाली ठाकूरने खडसावले

या ब्लॉगमध्ये त्यांनी विज्ञान भवनाला दिलेल्या भेटीच्या आठवणींनाही उजाळा दिला. तसेच त्यांनी लिहिलं की, आपल्याकडे असे महत्त्वाचे कार्यक्रम करण्यासाठी पुरेसे विज्ञान भवन नसल्याचे मला वाईट वाटते. हीच परिस्थिती मुंबईतही आहे. पाश्चिमात्य देशात सौंदर्य आणि कलागुण परिपूर्ण असलेली भरपूर ठिकाणे आहेत आणि ती पाहून आपण आश्चर्यचकितही होतो. त्यासारखी काही ठिकाणे आपण आपल्या देशातही असायला हवीत आणि लवकरच तसे होईल.