‘कैसी ये यारियां’ या टीव्ही शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता पार्थ समथानविरोधात २० वर्षीय मॉडेलने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. २० फेब्रुवारीला पार्थने माझा विनयभंग केला, अशी तक्रार मॉडेलने बांगुरनगर पोलीस ठाण्यात केली. पार्थवर पॉस्को कायद्याच्या कलम ८ आणि कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत येतो. या प्रकरणात पार्थला समन्सही पाठवण्यात आला होता, पण तो अनुपस्थित राहिला.

पार्थने २० फेब्रुवारीला मद्यधुंद अवस्थेत असताना मॉडेल सुश्मिता चक्रवर्तीसोबत गैरवर्तन केल्याचे या एफआयआरमध्ये म्हटलेय. मी गेल्या चार वर्षांपासून पार्थला ओळखते, असा जबाब सुश्मिताने दिला. ‘मी त्याला चार वर्षांपासून ओळखते. पार्थने अनेक वेळा मला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मागणी घातली होती. पण मी त्याला प्रत्येकवेळी नकार दिला. त्याच्या मित्र-मैत्रीणींमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यात काहीच अयोग्य नाही असं वाटत असेल. पण माझी मूल्य वेगळी आहेत. पार्टी संपल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्याने माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. त्या दिवसानंतर मी त्याच्यासोबत बोलणं बंद केलं. पण काही दिवसांनी त्याने त्या कृत्याची माफीही मागितली. आम्ही अनेक वर्षांपासूनचे मित्र असल्यामुळे मीही त्याला माफ केले. पण याचा काहीच परिणाम झालेला दिसला नाही, कारण परत मला इतर मुलांकडून अश्लील  संवाद ऐकवणारे फोन येऊ लागले होते.

कोणीतरी माझा नंबर इतर लोकांना शेअर करत होतं. या प्रकरणात पार्थ माझी मदत करतोय असंच तो भासवत होता. पण वास्तवात तोच हे सगळं करत होता. त्याच्या व्हॉट्सअॅपमध्ये एक ग्रुप आहे ज्यात मुलींची माहिती आणि त्याचे काही व्हॉइस नोट्सही आहेत. या व्हॉइस नोट्समध्ये स्पष्टपणे माझे चारित्र्य वाईट असून, मी सहजरित्या उपलब्ध होऊ शकते असे नमूद केले आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केले. तेव्हा मात्र मी सर्व गोष्टी आईला सांगितल्या. त्यानंतर आईनेच मला यासंदर्भात एफआयआर दाखल करण्याचा सल्ला दिला. तो एक अभिनेता असल्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करायची की नाही याबाबत माझ्या कुटुंबाने विचार केला. आम्ही ही तक्रार मागेही घेणार होतो, पण हा प्रश्न फक्त माझा नव्हता, माझ्यासारख्याच इतर मुलीही या ग्रुपच्या बळी पडल्या असतील त्यांचाही होता. त्यामुळे मी तक्रार मागे न घेण्याचा निर्णय घेतला. हा ग्रुप चालवणारे लहान मुलींना लक्ष्य करतात आणि त्यांचे शोषण करतात. मी त्यांच्या मागणीला होकार दिला नाही म्हणून मला लक्ष्य करण्यात आले आणि माझी प्रतिष्ठा पणाला लावली गेली. मी न्याय मिळेपर्यंत लढेन. मी सुशिक्षित कुटुंबातून आली आहे. एखादी व्यक्ती बरोबर असेल तर कितीही संकटं आली तरी नेहमी सत्याचाच विजय होतो.’, असेही सुश्मिताने म्हटले.