कॉफी विथ करणचा पहिला भाग २००४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची वेगळी मांडणी, कलाकारांना एकत्र बसवून त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे या धाटणीचा कार्यक्रम याआधी आला नव्हता. आता हाच शो त्याच्या १०० व्या भागापर्यंत येऊन पोहोचला आहे. या १०० व्या भागात सलमान खान, सोहेल खान आणि अरबाज खान दिसणार आहेत.

या १०० व्या भागापर्यंत पोहोचल्यानंतर करणलाही आपल्या भावनांना आवर घालता आला नाही. हे माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. एक आवड म्हणून सुरु केलेली ही गोष्ट आज माझ्या आयुष्याचा एक भाग बनली आहे. यावेळी करणनेही या शोच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, हा शो सुरु करण्यापूर्वी अनेकांनी मला असे न करण्याचा सल्ला दिला होता.

तो म्हणाला की, सुरुवातींच्या दिवसात मला अशा प्रकारचा चॅट शो करणे हे योग्य नाही, यामुळे माझी दिग्दर्शकाची ओळख पुसली जाईल अशा प्रकारचे सल्ले मला येत होते.

पण मला या सगळ्याचा अनुभव घ्यायचा होता. मी स्वतःशीच खेळून पाहिले. मला स्वतःचा अभिमान वाटतो. लोकांनाही या कार्यक्रमामुळे मी कोण आहे, कसा आहे ते कळले. मी कॉफी विथ करणसारखाच आहे. मजा, मस्ती आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वात हुशार. मी ही १२ वर्ष खूप एन्जॉय केली. आता या १०० व्या भागासाठीही मी पूर्णपणे तयार आहे.

हा शो थोड्याच भागांचा असतो यात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार मंडळी आवर्जुन येतात. करण स्वतः सिनेनिर्माता आणि सुत्रसंचालक आहे. आपल्या मंचावर लोकप्रिय कलाकारांना बोलावून तो त्यांची फिरकी घेत असतो.