बॉलिवूडमध्ये सर्वांत जास्त चर्चिली जाणारी बहिणींची जोडी म्हणजे करिना आणि करिष्मा कपूर यांची. जिम असो, पार्टी असो किंवा कुठलाही कार्यक्रम अनेकदा बेबो आणि लोलोने माध्यमांची लक्ष वेधली आहेत. दोघींच्या फॅशनमध्येही अनेकदा साम्य आढळलं. करिना आणि करिष्मा पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे दोघींनी नुकतंच एका जाहिरातीसाठी एकत्र शूटिंग केलं. त्यावेळी सेटवर करिनाचा चिमुकला तैमुर आणि करिष्माची दोन्ही मुलं समायरा आणि किआनसुद्धा उपस्थित होते.

एका जाहिरातीत या दोघी बहिणी एकत्र दिसणार आहेत. सोमवारीच या जाहिरातीचं शूटिंग पूर्ण झालं. यावेळी सेटवरील एक सुरेख फोटो करिष्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. हा फोटो पाहून सेटवरच करिना आणि करिष्माचा आपल्या मुलांसोबत छोटासा ‘गेट-टुगेदर’ झाला असं म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे तैमुरने पहिल्यांदाच आपल्या आईच्या कामाच्या सेटवर भेट दिली. फोटोमध्ये मावशी करिष्मासोबतच समायरा आणि किआन या भावंडांसोबत चिमुकला तैमुर खूपच गोड दिसतोय.

वाचा : ‘थलायवा’सोबत काम करणार ही मराठमोळी अभिनेत्री

लग्नानंतर आणि आई झाल्यानंतरही चित्रपटसृष्टीत काम करणार असल्याचं करिनाने याआधीच स्पष्ट केलं होतं. किंबहुना याच अटीवर तिने सैफ अली खानशी लग्न केल्याचं म्हटलं जात होतं. करिनाचा आगामी ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरु असून यामध्ये सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्याही भूमिका आहेत.