बिग बॉसच्या आठव्या पर्वापासूनच प्रेमाचे रंग उधळणाऱ्या अभिनेता उपेन पटेल आणि अभिनेत्री करिष्मा तन्ना यांच्या नात्यात दुरावा आल्याची बातमी काहीच दिवसांपूर्वी आली होती. मध्यंतरी ‘लव स्कूल’, ‘नच बलिए’ या कार्यक्रमांतून उपेन आणि करिष्माच्या प्रेमाने त्यांच्या चाहत्यांच्या मनावरही छाप पाडली होती. प्रसिद्ध वाहिनीच्या एका क्रार्यक्रमादरम्यान उपेनने करिश्माला प्रपोज केल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेकांना आणखीनच उत्सुकता लागून राहिलेली. पण उपेन पटेलने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन करिश्मासोबतच्या नात्यात आलेल्या दुराव्याबद्दलच्या बातमीला दुजोरा दिल्याने संपूर्ण चित्र स्पष्ट झाले. पण, दूर झाल्यानंतरही या दोघांमध्ये वाद होताना दिसत आहेत.
इंडियाफोरम डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, करिष्मा तन्ना आणि उपेन पटेल हे रस्त्यावर भांडताना दिसले. यावेळी करिष्मासोबत तिचा मित्रही होता. त्याने उपेनला गाडीत जाऊन बसण्यास सांगितले. पण उपेनने गाडीत जाऊन बसण्यास नकार दिला. त्यावर करिष्माने आपल्या मित्राकडे तक्रार करत म्हटले की, तो खूप हट्टी आहे. गाडीत बसण्यासाठी तयार नाही होणार. त्यानंतर पूर्वाश्रमीचे प्रियकर असलेले हे प्रेमीयुगुल गाडीत बसून एकमेकांशी वाद घालू लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मिनिटांनंतर करिष्मा गाडीतून बाहेर आली आणि रडू लागली. त्यानंतर उपेनही गाडीतून बाहेर येऊन फूटपाथवर बसला. या सर्व प्रकारानंतर उपेनचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला आणि दोघेही गाडीत बसून गेले. पण, तरीही या दोघांमधील वाद मिटले नाहीत. काही वेळानंतर उपेन गाडीतून बाहेर पडला आणि टॅक्सीत बसून निघून गेला. हा सर्व प्रकार ‘बँजो’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर घडला.
बॉलीवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील सेलिब्रिटी जोडप्यांना २०१६ हे वर्ष खडतरं असल्याचेच दिसतेय.
ind-forums-pic(छाया सौजन्य: इंडिया फोरम)