उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना येत्या ४८ तासांत भारत सोडून जाण्याचा आदेश दिला आहे. पाकिस्तानातील अनेक कलाकार विविध कार्यक्रमांसाठी सध्या मुंबईत आहेत. त्यांनी ४८ तासांत देश सोडला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्यांना पळवून लावेल असा इशारा मनसेचे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला आहे. दरम्यान, प्रसिद्ध निर्माते मुकेश भट्ट यांनी या बाबतीत त्यांचे मत मांडले आहे. येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत पाकिस्तानी कलाकारांकडून काम करुन घ्यायचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी सरकारनेच घ्यावा. जेणेकरुन त्यानुसार बॉलिवूडमध्ये पुढील रचना होतील असे मुकेश भट्ट यांचे म्हणणे आहे.

सध्या भारताने पाकिस्तानसोबत असलेले सर्व संबंध तोडावेत अशी तीव्र मागणी होत आहे. पण, एकाएकी असे करता कामा नये असे मत मुकेश भट्ट यांनी मांडले आहे. पण या बाबतीत सरकारनेच निर्णय घेणे योग्य ठरेल. ज्यामुळे कोणाचेच नुकसानही होणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या अल्टीमेटम विषयी बोलताना ज्या कलाकारांचे चित्रपट चित्रिकरणाचे काम अर्धे किंवा अर्ध्याहून जास्त प्रमाणात झाले आहे त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाशी कलाकारांचा काही संबंध नसतानाही त्यांना याची शिक्षा का?असा सवाल त्यांनी उठवला. पाकिस्तानी कलाकार त्यांचे काम, चित्रिकरण जर अर्ध्यावरच सोडून गेले तर त्याचा फटका थेट निर्मात्यांनाच बसणार आहे असेही ते म्हणाले. सदर परिस्थितीवर मुकेश भट्ट यांनी एक उपाय सुचवला आहे. जर पाकिस्तानी कलाकारांना काम करु द्यायचे नसेलच तर, भारत सरकारने तसा एक निर्णय घ्यावा. ज्यामध्ये येत्या सहा ते आठ महिन्यांच्या काळात या कलाकारांना त्यांचे चित्रपटांचे सुरु असणारे काम संपवूनच त्यानंतर मायदेशी परत जाण्याची मुभा असेल. पाकिस्तानी कलाकार आणि त्यांची भारतीय रसिकांमध्ये असणारी लोकप्रियता पाहता सध्या सर्वच क्षेत्रातून याप्रकरणी संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

पाहा: ‘गो बॅक टू पाक’
उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष वाढत आहे. जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले होते. राजकारणानंतर या घटनेचे पडसाद कलाक्षेत्रावरही पडताना दिसत आहेत.