गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. या बंदी विरुद्ध अनेक बॉलिवूड दिग्दर्शक आणि कलाकारांनी याचा विरोध केला होता. पण, भारतातील राजकीय नेत्यांसमोर बॉलिवूडलाही पडते घ्यावेच लागले होते. फक्त करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान दिसला होता. त्याला या सिनेमात घेण्यावरुनही अनेक वादांना करणला सामोरे जावे लागले होते.

पण यापुढील सिनेमात कोणताही पाकिस्तानी अभिनेता घेणार नाही या आश्वासनावर करण जोहरचा हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. मनसेने त्याच्या या वक्तव्यानंतरच हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यास परवानगी दिली होती. यानंतर राहुल ढोलकिया दिग्दर्शित रईस या सिनेमात शाहरुखची नायिका म्हणून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला घेण्यात आले होते. हा सिनेमा २०१७ मध्ये प्रदर्शित झाला खरा पण या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीही अनेक वाद झाले होते.

पण आता असे कळते की दिग्दर्शक महेश भट्ट पाकिस्तानी कलाकारांना भारतात परत बोलवण्यास सुरुवात करणार आहेत. बॉलिवूड लाइफ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, महेश भट्ट यांनी पाकिस्तानी गायक- अभिनेता अली जफरला कराचीमध्ये फोन केला होता आणि त्याला सीमेवर शांती रहावी या विषयावर गाणे गायला सांगितले आहे. सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, अलीने महेश यांच्या ऑफरला सकारात्मक उत्तर दिले आहे. एवढेच नाही तर महेश यांच्या या प्रोजक्टमध्ये शफकत अमानत अली हेही सहभागी होणार आहेत.  विशेष म्हणजे या प्रोजेक्टसाठी त्यांनी एकही पैसा घेतलेला नाही. या प्रोजेक्टच्या व्हिडिओमध्ये दिल्लीस्थित अभिनेता इमरान जाहिद दिसणार आहे.

याबद्दल बोलताना इमरान म्हणाला की, भट्ट यांनी ज्या पाकिस्तानी कलाकारांशी संपर्क केला आहे, ते सर्वच या प्रोजक्टबद्दल फार सकारात्मक आहेत. शफकत अमानत अली यांच्या मॅनेजरने तर एवढे सांगितले की, ते या प्रोजेक्टसाठी एकही रुपया घेणार नाहीत. आम्ही राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम यांनाही या प्रोजेक्टमध्ये सहभागी करुन घेण्याच्या प्रयत्नात आहोत.

इमरानने सांगितले की, ८ जूनला दिल्लीमध्ये मिलने दो या कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकारांचा आवाज वापरणार आहोत. मुंबईत हा कार्यक्रम २३ जूनला आयोजित करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे भारत सरकाने हे स्पष्ट केलेय की त्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर कोणत्याही प्रकारची बंदी घातली नव्हती. आता जर भारत सरकारने सर्व काही स्पष्ट केलेय तर आता विरोधक काय करु शकतात?