गुढी पाडवा म्हटलं की एक वेगळाच उत्साह प्रत्येकाचा मनात असतो. नवे वर्ष, नवे संकल्प, नवी स्वप्न… मनात अनेक सकारात्मक आशा घेऊन प्रत्येकजण येणाऱ्या वर्षाकडे आशावादी नजरेने पाहत असतो याला अपवाद कलाकारमंडळीही नाहीत. लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ आणि अभिनेता पियुष रानडे काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकले. मयुरीचा हा पहिला गुढी पाडवा. त्यामुळे या गुढी पाडव्याला मयुरी काय करणार याबाबत तिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी गप्पा मारल्या.

‘२८ तारखेला गुढी पाडवा आहे. लग्नानंतरचा हा माझा पहिलाच सण त्यामुळे तसा हा सण फार खास आहे. शिवाय पियुषचा वाढदिवसही त्याच दिवशी असल्यामुळे आमच्या घरी डबल सेलिब्रेशन असणार यात काही शंका नाही. पियुषचे आई-बाबा खास बडोद्यावरुन इथे येणार आहेत. माझेही आई- बाबा आमच्या घरी येणार आहेत त्यामुळे त्यादिवशी आम्ही सगळे नवीन वर्ष आणि पियुषचा वाढदिवस एकत्रच साजरा करु. कुटुंबाशिवाय दरवर्षीप्रमाणे पियुषच्या वाढदिवसानिमित्त आदल्या रात्री मित्र-मंडळीही घरी येतील त्यांच्यासोबतही चार निवांत क्षण आम्हाला घालवायला मिळणार आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी गुढी उभारुन दुपारी गोडाचं जेवण करु. पियुषला फारसं गोड आवडत नाही तर त्याच्या आवडीचा पदार्थही त्यादिवशी बनवण्याचा माझा विचार आहे. मी लहानाची मोठी डोंबिवलीत झाले, त्यामुळे शोभायात्रा हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. दरवर्षी सकाळी लवकर उठून गुढी उभारुन मित्र-मैत्रिणींसोबत मी गुढी पाडव्याच्या शोभायात्रेला जायचे. लहानपणी तर मी लेझीम पथकातही सहभाग घेतला होता. लहानपणीचा तो पाडवा माझ्या मनात अजूनही घर करुन आहे. पण आता लग्नानंतर मालाडला आल्यामुळे यावर्षी मी शोभायात्रा मिस करेन.

नववर्षाचा संकल्प असा काही मी ठरवला नाही. मी स्वतः शाकाहारी आहे. मी मांसाहार करत नाही किंवा बनवतही नाही. पण पियुष हा कट्टर मांसाहारी आहे. त्याच्यासाठी मी नवनवीन मांसाहारी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.’

शब्दांकन- मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@indianexpress.com