त्याचे वडील अभिनयातले ‘दादा’ म्हणून ओळखले जातात. तरी त्याने त्यांची ओळख सुरुवातीच्या काळात कधी सांगितली नव्हती. त्याला नृत्याची आवड होती. नृत्यात निपुण आहे म्हणून ‘दिल तो पागल है’ नाहीतर ‘ताल’सारख्या चित्रपटात नाचणाऱ्यांच्या गर्दीत तो पहिल्यांदा झळकला. मग एका पॉप गाण्यात तो चमकला. त्याला पाहिल्यानंतर हा पोरगेलसा दिसणारा बॉलीवूडचा हिरो होऊ शकतो, असे कुणीही म्हणू शकले नसते. पण तो बॉलीवूडचा चॉकलेट हिरो झाला. ‘इश्क विश्क’ या २००३ साली प्रदर्शित झालेल्या त्याच्या पहिल्या चित्रपटापासून ते आत्ताच्या ‘हैदर’पर्यंत पंचवीसपेक्षा जास्त चित्रपटांमधून त्याने काम केले आहे. तरीही दरवेळी शाहीद कपूरची नैय्या डुबली असे वाटतेय न वाटतेय तोच.. तो कधी ‘जब वी मेट’ किंवा ‘कमिने’ नाहीतर अगदी गेला बाजार ‘आर. राजकुमार’सारखा पोस्टर फाडत बाहेर येतो. आणि अरे! आपला हिरो परत आल्याचा आनंद त्याच्या चाहत्यांना मिळतो. ‘हैदर’नंतर पुन्हा एकदा त्याला ‘शानदार’ अपयशाने धुऊन काढले असले तरी त्याचा ‘टॉमी सिंग’ अवतार परत ‘उडता पंजाब’च्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांवर गारुड करता झाला आहे. सततच्या या चढउतारांचे बहुधा शाहीदलाही काही वाटत नसावे. कारण त्याच्यातल्या अभिनय गुणांना जोखणाऱ्या विशाल भारद्वाजसारख्या दिग्दर्शकांवर त्याचा विश्वास आहे.
‘शानदार’ हा शाहीदच्या नेहमीच्या धाटणीतला चित्रपट होता. त्याच्या भाषेत सांगायचे तर एकदम सोप्पा.. अगदी हातचा मळ. पण चित्रपट आपटला. त्यानंतर त्याने अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘उडता पंजाब’ या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. पंजाबमध्ये तरुणाईला विळख्यात घेणाऱ्या ड्रग्जचा आणि नशेच्या धुरात वेढलेल्या या प्रांताच्या भविष्याचे वास्तव चित्रण करणारा हा चित्रपट पूर्वी कधी शाहीदने स्वीकारला नसता. मात्र गेल्या काही वर्षांत विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘कमिने’, ‘हैदर’सारख्या वास्तववादी चित्रण असलेल्या चित्रपटांनीच त्याला यशाचा हात दिला आहे. लोकांना बहुधा मी अशाच चित्रपटांतून आवडू लागलो आहे, हे मलाही जाणवते आहे. अभिनेता म्हणून असे चित्रपट पर्वणी असते पण ते शरीराला आणि मनाला खूप थकवणारे चित्रपट असतात, असे शाहीद सांगतो. मी ‘आर. राजकुमार’ आणि ‘फटा पोस्टर निकला हिरो’सारखे चित्रपटही करू शकतो किंबहुना असे चित्रपट आपल्याला काम करायला आवडतात, असेही तो म्हणतो. मग ‘उडता पंजाब’सारखा इतकी वास्तववादी कथा असलेला चित्रपट त्याने का निवडला? दोन कारणे आहेत त्यामागे. एकतर असा चित्रपट म्हणजे कुठल्याही चांगल्या कलाकारासाठी खूप मोठी संधी असते. कलाकार स्वत:हून कित्येक र्वष अशा चित्रपटांची वाट पाहात असतात. त्यामुळे आपल्या वाटय़ाला अशी कथा आली असेल तर तो चित्रपट कलाकार म्हणून सोडू नये, हे झाले या चित्रपटामागचे त्याचे व्यावहारिक कारण. दुसरे कारण अधिक खरे आणि त्याला या पिढीच्या जवळ नेणारे आहे, असे तो सांगतो. ग्लॅमरच्या व्यवसायात असल्याने पाटर्य़ामधून, इव्हेंट्समधून नशा करणारे, दारू पिणारे, व्यसनी असे कित्येक लोक जवळून पाहिले आहेत. पण ‘उडता पंजाब’ची कथा अभिषेकने सांगितले तेव्हा इतक्या मोठय़ा प्रमाणावर आजची तरुण पिढी नशेच्या या विळख्यात अडकली आहे हे वाचून आश्चर्य वाटल्याचे शाहीद प्रामाणिकपणे सांगतो.
पंजाबच कशाला मुंबईच्या रस्त्यांवर रात्रीनंतर काय घडते? हे कोणाला माहितीच नाही असे नाही. पण अभिषेकने कथेतून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांची जी स्थिती मांडली आहे ती वाचल्यानंतर आपण जे काही वरवर पाहिले आहे त्याचे परिणाम किती भयाण आहेत हे लक्षात आले. त्यामुळे आजच्या पिढीला ही गोष्ट सांगायलाच हवी याबद्दल खात्री झाल्यानंतरच या चित्रपटासाठी होकार दिल्याचे त्याने सांगितले. पण अशा चित्रपटांसाठी सहसा नावाजलेले कलाकार काम करायला तयार होत नाहीत याचा अनुभव दिग्दर्शक अभिषेक चौबेबरोबर खुद्द शाहीदनेही घेतला. चित्रपटात चार महत्त्वाच्या व्यक्तिरेखा होत्या. त्यामुळे चार चांगले कलाकार ही चित्रपटासाठी गरजेची गोष्ट होती. मात्र क ोणीच तयार होत नव्हते. ‘शानदार’च्या निमित्ताने शाहीदची अलियाशी चांगली गट्टी जमली होती. त्यामुळे चित्रपट पूर्ण झाल्यानंतर अलिया तू तरी हा चित्रपट कर.. अशी विनंती त्याने तिला केली. मात्र अलियाची प्रतिक्रियाही त्याच्यासाठी धक्कादायकच होती. चित्रपटाची कथा ऐकल्यावर मला ही भूमिका करायचीच आहे, पण दिग्दर्शक मला इतकी चांगली भूमिका देईल का? असा उलटप्रश्न अलियाने शाहीदला केला. आपल्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना ‘उडता पंजाब’सारखा चित्रपट करण्याचे धैर्य अलियासारखी अभिनेत्रीच दाखवू शकते, असे म्हणत शाहीद तिला एक सर्वोत्तम अभिनेत्री असल्याची पावतीही देऊन टाकतो.
अलियानंतर दिलजीत दोसेन हा पंजाबी अभिनेता आणि मग करिना कपूर अशी या चित्रपटासाठीची चौकडी ठरली. असे चार मोठे कलाकार वास्तववादी चित्रण असलेल्या चित्रपटात एकत्र दिसणं हा दुर्मीळ अनुभव आहे. मात्र आम्ही सगळ्यांनीच वेगवेगळे चित्रीकरण केले. दिलजीत आणि अलियाबरोबर काही दृश्ये एकत्रित होती ती वगळली तर संपूर्ण चित्रीकरण वेगळे केले असल्याने फारसा एकत्र काम करण्याचा अनुभव आपल्याला मिळाला नाही, असे शाहीदने स्पष्ट केले. या चित्रपटात तो पहिल्यांदाच एका रॉकस्टारची भूमिका करतो आहे, त्यामुळे त्याला लुकही पूर्णपणे वेगळा देण्यात आला आहे. केसांची विचित्र रचना, अंगभर असलेले टॅटूज, त्याचे कपडे या सगळ्यापेक्षाही खुद्द् टॉमी सिंग बनून वावरणे आपल्याला जास्त अवघड गेल्याचे शाहीदचे म्हणणे आहे. नशा करणारे लोक दोन पद्धतीने व्यक्त होत असतात. ते नशा करतात तेव्हा आपण या दुनियेचे राजे आहोत जणू अशा स्थितीत ते वागत असतात. जणू ते या दुनियेतच नसतात. हवेतले त्यांचे बोलणे, वावरणे सगळे अजब असते. त्यांची नशा उतरते तेव्हा ते एकदम लाचार असतात. मला मुळात कसलेच व्यसन नाही. दारूही पीत नाही. त्यामुळे नशा चढल्यावर काय होते हे मला फक्त कल्पना करूनच रंगवायचे होते. टॉमी बोलेल कसा? वागेल कसा? कारण ही व्यक्तिरेखा रॉकस्टारची असली तरी त्याची कथा ही त्याच्या पडत्या काळाची आहे. अशी व्यक्तिरेखा कोणीही रंगवलेली नव्हती, असे शाहीद म्हणतो.
‘उडता पंजाब’ आणि लगेचच विशाल भारद्वाज यांचा ‘रंगून’ ज्यात त्याने सैफ अली खान आणि कंगनाबरोबर काम केले आहे. या दोन्ही चित्रपटांनी मानसिकरीत्या खूप थकवले असल्याने आता एखादी ‘आर. राजकुमार’ स्टाइल हलकीफुलकी फिल्म करायची असल्याचे त्याने सांगितले. त्याची पत्नी मीरा गर्भवती असल्याने घरचीही आघाडी सांभाळायची आहे. सध्या मी पत्नीचा गुलाम आहे ती सांगेल ते ऐकतो, असे तो गमतीने ऐकवतो. ‘रंगून’नंतर काय? हा विचार त्याला आता तरी सतावत नाही आहे. मध्यंतरीच्या काळात काही एक वेळ करिअरचा ताण घेऊन त्याने घालवला. त्यानंतर ‘आर. राजकुमार’ आला, ‘हैदर’ आला. शाहीदच्या करिअरने उसळी घेतली. त्या मानाने आता त्याची परिस्थिती खूप चांगली आहे. सध्या तरी लोकांनी आपल्याला टॉमी सिंगच्या भूमिकेत आपलेसे करावे एवढीच त्याची इच्छा आहे.
रेश्मा राईकवार