‘इश्किया’ या सिनेमात आपल्या भन्नाट जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते नसिरुद्दीन शहा आणि अर्शद वारसी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. लवकरच एका थरारपटातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत.

सध्यातरी ‘फिलहाल कोई जाने ना’ असे या सिनेमाचे नाव ठेवण्यात आले आहे. या सिनेमात बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजे सनी लिओनीही काम करणार आहे. या सिनेमात निर्मात्यांनी अभिनेत्रीच्या मुख्य भूमिकेसाठी सनी लिओनीला विचारले आहे. या सिनेमाची कथा ‘स्वदेस’ आणि ‘लगान’ यांसारख्या सिनेमात अभिनय केलेल्या अमीन हाजी याने लिहिली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शनही तोच स्वतः करणार आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना निर्माता अभिषेक जावकरने सांगितले की, या सिनेमात अर्शद वारसीची मुख्य भूमिका आहे. तर नसिरुद्दीन शहा यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सिनेमाची कथा थंड हवेच्या ठिकाणावर घडत जाते. म्हणूनच या सिनेमाचे चित्रिकरण देहरादून आणि पाचगणी यासारख्या ठिकाणी होणार आहे. तसेच सिनेमाच्या चित्रिकरणासाठी अजून काही ठिकाणांचाही विचार केला जात आहे. हा सिनेमा या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

https://www.instagram.com/p/BPQfJFoFJpk/

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सनी लिओनीने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ती शाहरुख खानच्या आगामी ‘रईस’ सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसते. ती किंग खानच्या आवाजात म्हणते की, ‘कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता’. शाहरुखच्या अंदाजात त्याच्याच सिनेमाचा डायलॉग बोलणारी सनी यात फार उत्साहीत दिसत होती. सोशल मिडीयावर टाकण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सनी ही शाहरुखच्या चाहत्यांना तिच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘रईस’ सिनेमात सनी लिओनीने ‘लैला ओ लैला’ या रिमेक गाण्यावर डान्स केला आहे. या गाण्यातील सनीचा अंदाज अनेकांना भावला आहे.