प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘द कपिल शर्मा शो’ सध्या चांगलाच अडचणीत आला आहे. काही दिवसांपूर्वीच विमानप्रवासादरम्यान विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादामुळे या क्रार्यक्रमाच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उदभवल्याचे दिसत आहे. कपिलने जाहीरपणे आपला अपमान आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी सुनील ग्रोवरने नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावरुन एक पोस्ट करत कपिलच्या शोकडे पाठ फिरवण्याचे संकेत दिले होते. तर, याच कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या चंदन प्रभाकरनेही नुकत्याच पार पडलेल्या चित्रिकरणाला गैरहजर राहत कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळतेय.

‘नाम शबाना’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने कपिल शर्मा शोच्या नव्या भागाचे चित्रिकरण नुकतेच पार पडले. पण, यावेळी कपिलच्या शोमधील हुकमी एक्के मात्र शोकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीतच हे चित्रिकरण पार पडले. मुख्य कलाकारांनी शोकडे पाठ फिरवल्यामुळे त्या दिवसाच्या चित्रिकरणासाठी शेवटी ‘द कपिल शर्मा शो’च्या टीमतर्फे वेळ मारुन नेण्यासाठी एहसान कुरेशी, सुनील पाल आणि राजू श्रीवास्तव या कलाकारांना बोलवावे लागल्याचेही म्हटले जात आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अली असगर, सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर या कलाकारांकडून होणारी विनोदाची खेळी आणि कलाकार, प्रेक्षकांचे मनोरंजन यामुळेच कपिलच्या शोला इतके यश मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता जर का या मुख्य कलाकारांनीच कपिलच्या शोकडे पाठ फिरवली तर प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास हा कार्यक्रम कितपत यशस्वी ठरणार? असाच प्रश्न सध्या अनेकांना पडत आहे.

दरम्यान, सुनील ग्रोवर कार्यक्रम सोडणार नसल्याचे वक्तव्य कपिल शर्माने ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना केले होते. सुनीलची मनधरणी करण्यासाठी कपिलने कितीही आटापिटा केला तरिही आता सुनील या प्रकरणी कोणती भूमिका घेणार याकडे अनेकांचेच लक्ष लागले आहे. सध्या सोशल मीडिया टेलिव्हिजन आणि कलाविश्वामध्ये कपिल शर्मा, सुनील ग्रोवर यांच्यातील वादाच्याच चर्चा रंगत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील एका क्रार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर कपिल शर्मा आणि त्याची सबंध टीम परतत असतानाच ही घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या कपिल शर्माला शांत करण्यासाठी पुढे गेलेल्या सुनील ग्रोवरला कपिलने शिवीगाळ करत तो त्याच्या अंगावर धावून गेला. याशिवाय इतर सहकलाकारांबद्दलही कपिल बरेच काही बरळून गेला. त्यामुळे स्वत:च्याच वक्तव्यामुळे कपिलने सर्वांचा रोष ओढवून घेतल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.