अश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव गेली दोन दशकं या क्षेत्रात कार्यरत आहे. तिने केलेल्या सर्वच भूमिका या रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. फक्त मराठीतच नाही तर तिने तिच्या कलाकृतीने बॉलीवूडमध्येही वेगळी अशी ओळख निर्माण केली. मात्र, लग्नानंतर ती अमेरिकेत जाऊन स्थायिक झाली. गेल्याच वर्षी मायदेशात परतलेल्या या अभिनेत्रीने पुन्हा नव्याने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिचे ‘ध्यानीमनी’ आणि ‘मांजा’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपटातील तिचे काम लोकांनी खूप पसंत केले.

वाचा : .. म्हणून आमिरने केली सुरक्षेत वाढ

आपल्या आवडत्या कलाकाराविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी अश्विनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लाल गाऊन घातलेला तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर सर्व नेटिझन्समध्ये एकच चर्चा सुरु झाली. हा फोटो अश्विनीने नेमका का अपलोड केला असेल? तिने हे ग्लॅमरस फोटोशूट नक्की का केलं? तिचा नवीन चित्रपट येतोय का? असे अनेक तर्कवितर्क लावले गेले. या फोटोशूटचं उत्तर म्हणजे तिची वेबसाइट. अश्विनीने नुकतीच स्वतःची http://www.ashvinibhave.com ही वेबसाइट लाँच केली असून, वेबसाइटचे आकर्षण म्हणजे तिचे एक्सक्लुसिव्ह असे फोटो.

अश्विनीबद्दलची सर्व माहिती तिच्या या वेबसाइटवर अगदी सहजरित्या उपलब्ध आहे. फक्त चित्रपटच नाही, तर तिच्या संपूर्ण आयुष्याची कारकिर्द त्यांना जवळून अनुभवता येईल. किशोर वयापासून ते आतापर्यंत तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्वच गोष्टींची नोंद यात आहे. तिचे सिनेसृष्टीतील पदार्पण आणि अमेरिकेतील स्थलांतर याबद्दल सारं काही या वेबसाइटवर तुम्हाला वाचायला मिळेल. तिने केलेले चित्रपट, भूमिका आणि त्यातील छायाचित्र या सगळ्याचा त्यात समावेश आहे.

वाचा : … अन् सुवर्ण मंदिरात गेलेल्या अक्षयला कोणी ओळखलंच नाही

वेबसाइटवर तिने केलेल्या ‘हिना’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटादरम्यान झालेले किस्से मांडले आहेत. तसेच, ‘राजा संन्यास’ नाटकात आणि ‘आर के स्टुडिओ’मध्ये अनुभवलेल्या प्रसंगातून मिळालेल्या शिकवणची नोंदही करण्यात आलीय. हे सर्व वेबसाइटच्या पेजवरील फिल्मी स्टोरीज यात पाहायला आणि वाचायला मिळेल. इतकंच काय तर या वेबसाइटद्वारे प्रेक्षक अश्विनीसोबत थेट संवादही साधू शकणार आहेत.