ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळणार? ‘ला ला लँड’, ‘मूनलाइट’ की ‘फेन्सेस’चे वर्चस्व या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार? असे बहुविध प्रश्न चाहत्यांना जसे पडतात तसेच ते कलाकारांनाही पडत असतात. ऑस्करच्या सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. स्टेज, बॅकस्टेज, रेड कार्पेट, सेलिब्रिटींची एण्ट्री, माइक, लाइट्स आणि अशा बऱ्याच गोतावळ्यामध्ये सध्या कॅलिफोर्निया तयार होत आहे. ऐटित येणारे कलाकार, कॅमेरासमोर त्यांचं ते स्मितहास्य आणि महागडे, कलात्मक कपडे कसे असतील याविषयीसुद्धा अनेकजण त्यांचा अंदाज बांधत आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या उत्साहपूर्ण वातावरणात आणखी एका गोष्टीबद्दल बऱ्याच जणांच्या मनात कुतूहल असते ती गोष्ट म्हणजे ऑस्करनंतर होणारी ‘अफ्टर पार्टी’.

पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर सर्वच सेलिब्रिटी आणि त्या सोहळ्याला उपस्थिती लावलेल्या प्रत्येकाची झलक या आफ्टर पार्टीमध्येही पाहायला मिळते. या अफ्टर पार्टीचा मेन्यू काय असणार, कोणत्या शेफने हा मेन्यू ठरवला आहे आणि पार्टीत सर्वात जास्त धम्माल कोण करणार याविषयी आता बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.
‘द गव्हर्नर्स बॉल’ ही ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर पार पडणारी अधिकृत अफ्टर पार्टी आहे.

या ठिकाणी पुरस्कार विजेती कलाकार मंडळी त्यांच्या पुरस्कारासह येतात. इतर उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आणि सर्वांची गळाभेट घेत या पार्टीची शोभा वाढतच जाते. आनंद, मैत्री, गप्पा आणि भरपूर खाणं-पिणं या पार्टीतील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या सर्व उत्साही वातावरणाला झाक असते ती म्हणजे सोफेस्टिकेशनची. यंदाच्या गव्हर्नर्स बॉल पार्टीसंबंधीची काही माहिती द इंडिपेंडंट या संकेतस्थळाने प्रसिद्ध केली आहे. यंदाच्याही ऑस्कर अफ्टर पार्टीची धुरा ऑस्ट्रीयन वंशाच्या एका अमेरिकन शेफने सांभाळली आहे. शेफ वोल्फगँग पक गेल्या २३ वर्षांपासून ऑस्करच्या अफ्टर पार्टीची धुरा सांभाळत आहेत.

या पार्टीसाठी विविध पदार्थांची एक लांबलचक यादीच तयार करण्यात आली आहे. ‘सेव्हरी बाइट्स’, ‘डेसर्ट स्टेशन’, ‘सुशी स्टेशन’ असे विविध विभाग करत जीभेचे चोचले पुरविण्यासाठी पक यांनी पदार्थ निश्चित केले आहेत. ‘कोरिअन स्टेक टार्टेअर ऑन पफ्ड राइस’, ‘बेक्ड पोटॅटो विथ कॅविअर’, ‘लॉब्स्टर कॉर्न डॉग्स’ या पदार्थांसोबतच आणखीही बरेच पदार्थ या यादीत पाहायला मिळणार आहेत. लज्जतदार पदार्थ, पार्टीचा माहोल आणि त्यालाच काहीशी आलिशान जोड देणारे खास पदार्थही या पार्टीमध्ये असणार आहेत.

unnamed-2

unnamed-3

unnamed

या पार्टीमध्ये गोडाच्या पदार्थांचेही बरेच प्रकार असणार आहेत. ऑस्कर पुरस्कारांची प्रतिकृती असणारे चॉकलेट्सही या पार्टीमध्ये सर्वांनाच मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना पुरस्कार सोहळ्यात मानचिन्ह मिळणार नाही त्यांनी निराश होण्याचं काहीच कारण नाही. कारण या चॉकलेटच्या प्रतिकृतीच्या रुपात प्रत्येकजण ऑस्कर त्यांच्यासोबत नेऊ शकणार आहे असे शेफ वोल्फगँग इंडिपेंडंटसोबत संवाद साधताना म्हणाले. ‘स्लो कुक्ड चिकन पॉट पाय विथ ब्लॅक ट्रफल्स’ हा पदार्थ जॉन ट्रवोल्टा, बार्बरा स्ट्रेसँड आणि वायोला डेव्हिस यांच्या खास शिफारसीवरुन मेन्यूत ठेवण्यात आला आहे. या मेन्यूमधील आणखी एक खास पदार्थ म्हणजे ‘गोल्ड डस्टेड पॉपकॉर्न’. नावातूनच एक वेगळा रुबाब झळकतो आहे ना?

कलाकारांच्या कलेचे कौतुक झाल्यानंतर ऑस्करच्या अफ्टर पार्टीमध्येसुद्धा मौजमजा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार यात शंकाच नाही. विविध रंगांचे, चवीचे आणि आकाराचे खाद्यपदार्थ या पार्टीची शोभा, शोभा म्हणण्यापेक्षा पार्टीची चव वाढवणार आहे असेच म्हणायला हवे.