यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा २६ फेब्रुवारीला कॅलिफोर्नियात पार पडणार आहे. चित्रपट आणि कलाविश्वामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन मिळण्याच्या शर्यतीत बऱ्याच चित्रपटांच्या नावांचा समावेश होता. त्यातील काही चित्रपटांनी नामांकन मिळवण्यात यश मिळवले तर काहींना मात्र यात अपयश आले. ऑस्करच्या शर्यतीत नामांकन मिळवण्यात यश मिळवलेला असाच एक बहुचर्चित चित्रपट म्हणजे ‘ला ला लॅण्ड’. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ‘ला ला लॅण्ड’चेच वर्चस्व पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता ऑस्करमध्ये हा चित्रपट वर्चस्व राखण्यात यशस्वी होणार का? की, ‘ला ला लॅण्ड’ला तुरी देत ‘मूनलाइट’, ‘लायन’ यांसारखे चित्रपट पुरस्कार पटकावणार याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडिया आणि एकंदर चित्रपटांविषयीच्या सुरु असणाऱ्या चर्चांच्या आधारे कोणत्या चित्रपटांचे यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर वर्चस्व असणार याचा घेतलेला हा आढावा..

सर्वोत्कृष्ट चित्रपट- या विभागात ‘अरायव्हल’ (Arrival), ‘फेन्स’ (Fences), ‘हॅकसॉ रिज’ (Hacksaw Ridge), ‘हेल ऑर हाय वॉटर’ (hell or high water), ‘ला ला लॅण्ड’ (La La Land), ‘लायन’ (Lion), ‘मूनलाइट’ (Moonlight), ‘मँचेस्टर बाय द सी’ (manchester by the sea) या चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. या सर्व चित्रपटांपैकी ‘ला ला लॅण्ड’ला अनेकांनी प्राधान्य दिले तरीही ऑस्करमध्ये मात्र ‘मूनलाइट’ हा चित्रपट ‘ला ला लॅण्ड’ला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. आकडेवारी, समीक्षकांची पसंती आणि एकंदर प्रेक्षकांचा कल पाहता ‘मूनलाइट’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरु शकतो.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- या विभागात इसाबेल हपर्ट (isabelle huppert) (एल), रुथ नेगा (Ruth Negga) (लव्हिंग), नतालि पोर्टमन (Natalie Portman) (जॅकी), एमा स्टोन (Emma Stone) (ला ला लॅण्ड), मेरिल स्ट्रीप (Meryl Streep) (फ्लोरेन्स फोस्टर जेनकिन्स) या अभिनेत्रींना नामांकन मिळाले असून एमा स्टोन या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार मानली जात असली तरीही, नतालि पोर्टमनच्या ‘जॅकी’ मधील अभिनयाला विसरुन चालणार नाही. इथे या दोघींना टक्कर देण्यासाठी ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार विजेती अभिनेत्री इसाबेल हपर्टही सज्ज आहे. त्यामुळे अनेकांच्या म्हणण्यानुसार इसाबेलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागातील ऑस्कर मिळू शकतो.

सर्वोत्कृष्ट अभिनेता- केसी अफ्लेक (Casey Affleck) (मँचेस्टर बाय द सी), अॅण्ड्र्यू गारफिल्ड (Andrew Garfield) (हॅकसॉ रिज), रायन गॉस्लिंग (Ryan Gosling) (ला ला लॅण्ड), विगो मोर्टेनसेन (Viggo Mortensen) (कॅप्टन फँटॅस्टिक), डेन्झेल वॉशिंग्टन (Denzel Washington) (फेन्स) या नामांकन प्राप्त अभिनेत्यांपैकी ‘फेन्स’ या चित्रपटासाठी डेन्झेल वॉशिंग्टनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात येऊ शकते.

fences-film-golden-globes-2017-image-for-inuth

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- या विभागातील पुरस्कारांवर भारतीय चित्रपट रसिकांच्याही नजरा लागल्या आहेत. कारण भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल (Dev Patel) यालाही या विभागासाठीचे नामांकन मिळाले आहे. महेरशाला अली (मूनलाइट), जेफ ब्रिजेस (हेल ऑर हाय वॉटर), लुकास हेज (मँचेस्टर बाय द सी), देव पटेल (लायन), मिशेल शेनॉन (नोकटर्नल अॅनिमर्ल्स) या सर्व नावांपैकी महेरशाला अली या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

moonlight-image

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- या विभागात ‘फेन्स’ चित्रपटातील वाओला डेव्हिस या अभिनेत्रीच्या हाती ऑस्करचे मानचिन्ह स्थिरावू शकते. या विभागासाठी विओला डेव्हिस (फेन्स), नेओमी हॅरीस (मूनलाइट), निकोल किडमन (लायन), ऑक्टेव्हिया स्पेन्सर (हिडन फिगर्स), मिशेल विलियम्स (मँचेस्टर बाय द सी) या अभिनेत्रींनाही नामांकन मिळाले आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- या विभागातील पुरस्कारासाठी अनेकजण उत्सुक असल्याचे म्हटले जात आहेत. डेनिस विलनेव (अरायव्हल), डेमिअन चॅजेल (ला ला लॅण्ड), मेल गिब्सन (हॅकसो रिज), बॅरी जेन्कीन्स (मूनलाइट), केनिथ लोनरगन (मँचेस्टर बाय द सी) या दिग्दर्शकांपैकी ‘ला ला लॅण्ड’ या चित्रपटाच्या सुरेख दिग्दर्शनासाठी डेमिअन चॅजेलला यश मिळू शकतं.

la-la-land-twitter

या सर्व महत्त्वाच्या पुरस्कारांव्यतिरिक्त इतर विभागातील पुरस्कारांसाठीचेही काही अंदाज बांधण्यात आले आहेत. खालील यादी ही केवळ अंदाज वर्तविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली असून पुरस्कार विजेत्यांची अचूक नावे लवकरच आपल्या समोर येतील.

ओरिजिनल स्कोअर- ला ला लॅण्ड
सर्वोत्कृष्ट मूळ गाणे- सिटी ऑफ स्टार्स (ला ला लॅण्ड)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिचर- बॉरोड टाइम