नेहमीच आपल्या ठाम मतांसाठी आणि चौकटीबाहेरच्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या राधिका तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. आर. बाल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ या चित्रपटामध्ये राधिका एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

याच चित्रपटाविषयी बोलताना राधिकाने काही महत्त्वाच्या विषयांवर पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. राधिकाच्या मते भारतात मानवी शरीराविषयी काहीही बोलणे त्रासदायक असते. याविषयीच बोलताना राधिका म्हणाली, ‘या देशात सेक्स, लैंगिकता या विषयांवर बोलणं एक लज्जास्पद बाब आहे. त्यामुळे कोणत्याशी शारीरिक किंवा लैंगिक गोष्टीविषयी बोलणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं.’ याव्यतिरिक्त इतरही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर राधिकाने अनेकांचेच लक्ष वेधले. ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत राधिकाने तिचे विचार मांडले.

यावेळी राधिका तिच्या आगामी चित्रपटाविषयीसुद्धा बोलली. अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे कथानक सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या एका सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनावर बेतलेले आहे. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगानंदम यांचा बायोपिक आहे. मासिक पाळी हा आपल्याकडे गुप्ततेचा विषय. काही वर्षांपूर्वी तर याबद्दल मोकळेपणाने बोललेही जायचे नाही. इतकेच काय तर त्या काळात स्वच्छतेच्या मुद्द्याकडेही दुर्लक्ष केले जायचे. अरुणाचलम मुरुगानंदम यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी स्त्रियांसाठी विशेषत: खेड्यातील स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स (पॅड) तयार केले आणि त्यानिमित्ताने अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून दिला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली असून अक्षयनेच एक फोटो ट्विट करत त्यासंबंधीचा माहिती दिली होती. एका महत्त्वाकांक्षी व्यक्तीच्या जीवनप्रवासावर या चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश टाकण्यात येणार असून, चित्रपटाच्या निर्मितीची धुरा ट्विंकल खन्ना सांभाळत आहे. अभिनेत्री, लेखिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ट्विंकल खन्ना ‘पॅडमॅन’द्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.