१ डिसेंबर हा दिवस बॉलिवूड चाहत्यांसाठी दिवाळीसारखाच असेल यात काही शंका नाही. या दिवशी संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासाठी आतापासूनच चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता पाहून हा सिनेमा सुपरहिट होईल असेच म्हटले जात आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा सिनेमा सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे.

ट्रेलरमध्ये शाहिद कपूर आणि दीपिका पदुकोणच्या व्यक्तिरेखांचे कौतुक तर झालेच. पण, प्रेक्षकांना सर्वात जास्त भावला तो रणवीर सिंग. रणवीरने ज्या पद्धतीने अलाउद्दीन खिल्जी ही व्यक्तिरेखा साकारली ते कौतुकास्पद आहे. पण रणवीरच्या या व्यक्तिरेखेमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील प्रसिद्ध व्यक्तिरेखा खाल ड्रोगोची झलक पाहता येते. तुम्हाला काय वाटतं की ड्रोगोचा हा लूक खिल्जीसाठी कॉपी केला आहे की नाही?

पद्मावतीच्या ट्रेलरमध्ये रणवीचा लूक ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सीरिजमधील खाल ड्रोगोसारखाच दिसून येतो. ज्या पद्धतीने खाल या सीरिजमध्ये कणखर लूकमध्ये दिसतो तसाच लूक पद्मावतीमध्ये रणवीरचाही दिसतो.

फक्त मेकअप आणि लूकमध्येच नाही तर वेशभूषेमध्येही अनेक गोष्टी या अमेरिकन सीरिजमधून प्रभावीत होऊन घेतल्याचे दिसते. ट्रेलरमध्ये रणवीरनेही तसेच शर्ग वापरले आहे जसे शर्ग ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये जॉन स्नो वापरतो.

मेकअप आणि वेशभूषेनंतर रणवीरच्या व्यक्तिरेखेचा व्यवहारही खालशी साधर्म्य सांगणाराच आहे. ट्रेलरमध्ये एका सीनमध्ये रणवीर विकृत पद्धतीने मांस खाताना दाखवण्यात आला आहे. खाल ड्रोगोही आपल्या ऑनस्क्रिन व्यक्तिरेखेमध्ये एका लढाईदरम्यान, एका माणसाची जीभ खेचून हातात चिरडताना दाखवण्यात आले आहे.

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानतंर रणवीरचा लूक फारच चर्चेत आला होता. आता सिनेमात रणवीर आपल्या व्यक्तिरेखेला कशा पद्धतीने जीवंत करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. इंटरनेटवर रणवीरच्या लूकची खाल ड्रोगोशी तुलना करुन अनेक विनोदही व्हायरल होत आहेत. रणवीरने साकारलेला हा खलनायक पाहून खाल ड्रोगोची क्रुरता तुम्हाला नक्कीच आठवली असेल.