गेल्या काही दिवसांपासून सेन्सॉर बोर्डाचा विषय चांगलाच गाजतोय. कार्यकाळ संपण्याच्या पाच महिन्यांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानींची केलेली उचलबांगडी आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांनी केलेले आरोप सर्वांचंच लक्ष वेधणारे आहेत. ‘लेहरे टीव्ही’ या युट्यूब चॅनेलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बरेच गौप्यस्फोट केले आहेत. कबीर खान, अनुराग कश्यप या दिग्दर्शकांवरही त्यांनी निशाणा साधला.

‘इंदू सरकार’ चित्रपटामुळे निहलानींची उचलबांगडी कशाप्रकारे झाली, ‘उडता पंजाब’ चित्रपटाला मान्यता न देण्यासाठी कशाप्रकारे त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यात आला या सर्व गोष्टी त्यांनी स्पष्टपणे मांडल्या. निहलानी त्यांच्या वादग्रस्त मार्गदर्शक तत्त्वांबरोबरच वादग्रस्त वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. ‘बजरंगी भाईजान’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित न होऊ देण्यासाठी त्यांना गृह खात्याकडून कळवण्यात आल्याचंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. गृह खात्याशी अनेकदा पत्रव्यवहार केल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असंही ते म्हणतात. यावेळी त्यांनी ‘बजरंगी भाईजान’चे दिग्दर्शक कबीर खानवरही निशाणा साधला.

वाचा : ‘इंदू सरकार’मुळेच माझी उचलबांगडी; पहलाज निहलानींचा गौप्यस्फोट

‘कबीर खान एक अनप्रोफेशनल माणूस आहे. त्याच्या चित्रपटात एकही कट सांगितलं नसतानाही त्याने नेहमीच माझ्याविरोधात वक्तव्ये केली. ‘ट्युबलाइट’ पेटली असो किंवा नसो त्याच्या कोणत्याच चित्रपटाला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागला नव्हता. आजच्या घडीला सलमान खानसारख्या सुपरहिरोला घेऊन तुम्ही चांगले चित्रपट नाही काढू शकत, तर तुम्ही कुठे आहात हे समजायला हवं,’ असं ते म्हणाले.

वाचा : …म्हणून कपिल शर्मा बिग बींसोबत केबीसीचं शूटिंग करु शकणार नाही

दिग्दर्शक अनुराग कश्यपसंदर्भातही त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ‘कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटात काही कट्स सांगितले होते. समितीने कट्स सांगितल्यानंतरही चित्रपटात ते शब्द तसेच राहिले. म्हणजेच त्याने फाईलमध्ये सुचवलेल्या कट्समध्ये फेरफार केले. चित्रपटात बॉम्बे हा शब्द मुंबई असं करण्यास त्याला सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्याचा ‘बॉम्बे वेल्वेट’ हा चित्रपट आला. यातूनच फेरफार झाल्याचं स्पष्ट होतंय. अनुराग कश्यपने नेहमीच प्रसिद्धीसाठी वाद निर्माण केले,’ असंही निहलानी म्हणाले.