नुकत्याच झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये पदक विजेती कामगिरी करणारे खेळाडू लवकरच ‘कपिल शर्मा शो’ मध्ये दिसणार आहेत. मरीयप्पन थांगवेलू, देवेंद्र झांझरिया, वरुण सिंह भाटी आणि दीपा मलिक या चार खेळाडूंना कपिल शर्माने त्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे मिमंत्रण दिले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला भारतात परतलेले हे क्रीडापटू ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत येणार आहेत. यावेळी ६ आणि ७ ऑक्टोबरला कपिल शर्मा शोचे चित्रीकरण होईल.

पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या चार क्रीडापटूंचा ३० सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात सन्मान होणार आहे. यानंतर हे खेळाडू मुंबईच्या दिशेने रवाना होतील. यावेळी हे खेळाडू सचिन तेंडुलकरची भेट घेतील. सचिनने या खेळाडूंना त्याच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले आहे.

‘मुंबईला जाण्याआधी आम्ही ३० सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या भेटीला जाणार आहोत. त्यानंतर आम्ही क्रिकेटच्या जगातील महान व्यक्तीमत्त्व असलेल्या सचिन तेंडुलकरला मुंबईत भेटू. इतक्या मोठ्या व्यक्तीने आम्हाला आमंत्रित करणे, हा आमचा सन्मान आहे’, अशी भावना नोएडामध्ये राहणाऱ्या वरुणने व्यक्त केली आहे. वरुणने उंच उडीमध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे.

‘कपिल शर्माच्या शो मध्ये सहभागी होणे, हा एक वेगळा अनुभव असेल,’ अशी प्रतिक्रिया स्वभावाने थोडा लाजाळू असणाऱ्या वरुणने दिली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, महान खेळाडू सचिनची भेट आणि कपिल शर्माच्या शो मध्ये सहभागी होण्याची संधी या सर्वच गोष्टींची अतिशय उत्सुकता असल्याची भावना दीपा मलिकने व्यक्त केली आहे. पॅरालिम्पिकमध्ये पदक विजेती कामगिरी करणारी पहिली महिला खेळाडू होण्याचा मान दीपा मलिकने पटकावला आहे.