क्रीडा असो किंवा अभिनय क्षेत्र असो, सदर क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना मिळणारे मानधन हे पुरुषांपेक्षा कमी असते. त्यामुळे एकाच क्षेत्रात काम करुनही पुरुष आणि स्त्री यांच्या मानधनात केला जाणारा भेदभाव हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. याचबाबत बॉलीवूड अभिनेता आमीर खान महिला कलाकारांच्या बाजूने उभा राहिला आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
आमिर म्हणाला की, आपण अजूनही पुरुषप्रधान मानसिकता असलेल्या समाजात जगत आहोत. त्याचा परिणाम अभिनेत्रींच्या मानधनावरही होतोय. एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री सिनेमागृहाकडे किती प्रेक्षक खेचतो यावर निर्मात्याने त्यांचे मानधन ठरवायला हवे. एक काळ होता जेव्हा सलीम-जावेद (लेखक) यांना सर्वाधिक मानधन दिले जायचे. केवळ त्यांचे नावचं चित्रपट ब्लॉकबस्टर होण्यासाठी पुरेसे होते. पण, सगळेचं निर्माते काही स्त्री-पुरुष यावरून मानधन नाही ठरवतं. जो जास्त प्रेक्षकवर्ग सिनेमागृहाकडे खेचेल त्याला ते अधिक मानधन देतात. यालाचं जोडून त्याची पत्नी आणि आगामी दंगल चित्रपटाची निर्माती किरण राव म्हणाली की, पुरुष-स्त्री यावरून तुम्ही कोणाचेही काम आणि कल्पकता ठरवू शकत नाही. जेव्हा आमच्या निर्मिती संस्थेचा विषय येतो तेव्हा मी आणि आमीर नेहमीच ‘जसे काम, तसे मानधन’ यावर विश्वास ठेवतो. दोघांमध्ये भेद करण्यात काही अर्थचं नाही.
आगामी दंगल चित्रपटात मुलींचे महत्त्व आणि स्त्री-पुरुष समानता यावर भाष्य करण्यात आल्याचे आमीरने यावेळी सांगितले. सध्या तो याचं चित्रपटावर काम करत असून, त्यासाठी तो लुधियानाला गेला आहे.