सोनी वाहिनीवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या ‘पहरेदार पिया की’ या मालिकेवर आता खुद्द टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांनीच खंत व्यक्त केली आहे. या मालिकेच्या प्रोमोपासूनच नेमकं कथानक कसं असणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. या मालिकेच्या प्रोमोमध्ये एक लहान मुलगा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीच्या भांगात कुंकू भरताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या मालिकेचं मूळ कथानक कसं असणार आहे याबाबत आता बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रतन (अफान खान) आणि दिया (तेजस्वीनी पारेख वायंगणकर) यांची चौकटीबाहेरील जोडी या मालिकेच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. एका तरूणीचं तिच्याहून वयाने बऱ्याच लहान मुलाशी होणारं लग्न आणि त्यांच्यात परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नात्यातील रहस्य हा या मालिकेचा विषय आहे. पण, या मालिकेचं हे कथानक सध्या अनेकांनाच खटकतंय. किंबहुना एका तरूणीचं लहान मुलाशी लग्न लावण्यामागचं काय कारण? हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय. मुख्य म्हणजे टेलिव्हिजन अभिनेता करण वाही यालासुद्धा मालिकेचं कथानक खटकलं आहे. त्यामुळेच त्याने फेसबुकवर या कार्यक्रमाविषयी आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे.
It feeels great actually to be TROLLED .. good or bad atleast i know my opinion matters … #wecanbebetterthanthis
— Karan Wahi (@karan009wahi) July 19, 2017
my opinion is MINE … i dont judge the book by its cover but then dont sell me a misleading cover…
Its an opinion
U r free not to agree— Karan Wahi (@karan009wahi) July 19, 2017
‘हे माझं स्वत:चं मत आहे. फक्त पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहूनच त्याच्याविषयी अंदाज बांधता येऊच शकत नाही. पण, मग दिशाभूल करणारं मुखपृष्ठ ठेवण्याचीही काहीच गरज नाही’, असं ट्विट करणने केलं आहे. करणने या कार्यक्रमाविषयी खंत व्यक्त केल्यानंतर या मालिकेतील अभिनेता सुयश रायने मालिकेविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मालिकेतीलच काही दृश्यांचे फोटो काढत त्यासोबत भलंमोठं कॅप्शनही लिहिलं आहे. करण वाहीला उद्देशून त्याने लिहिलंय, ‘करण वाहीने जे म्हटलंय त्याला कोणीही विरोध करु शकत नाही. ते सर्वस्वी त्याचं मत आहे. पण, आम्ही सर्वच कलाकारांनी या कार्यक्रमासाठी फार मेहनत घेतली आहे. आम्ही फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करु इच्छितो. बालविवाह किंवा इतर कोणत्याच रुढीला प्रोत्साहन देण्याचा आमचा मनसुबा नाही’, असं त्याने स्पष्ट केलंय. सुयशने मालिकेविषयी मांडलेलं हे मत आणि सध्या प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी असणाऱ्या या दुमताचा टिआरपीवर काही परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचा : …म्हणून कटप्पाच्या मुलीने लिहिलं मोदींना पत्रं