श्रीगणेशाच्या आगमनाची चाहूल अवघ्या महाराष्ट्राला लागली असून, अनेकजण गणरायाची आरास साकारण्यात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळते. अशातच प्रियांका चोप्राने तिच्या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटातील ‘या रे या, सा रे या, गजाननाला आळवूया…’ हे गणपतीवर आधारित गाणे बाप्पाच्या चरणी अर्पण केले. याबाबतचे ट्विट तिने प्रसिद्ध केले आहे. राजेश मापुसकर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर या चित्रपटाबाबत मी फार उत्साही होते, असे प्रियांकाने ट्विटर म्हटले होते. आता ट्विटरच्या माध्यमातूनच तिने या चित्रपटाचे पहिले गाणे लाँच केले आहे. गणेशोत्सवादरम्यान गजाननाची आराधना करताना बाबा आणि काकांच्या तोंडून ‘या रे या, सा रे या’ हे गाणे मी नेहमी ऐकल्याचे सांगत, श्रीवर्धनमध्ये साजरा केलेला तोच काळ या गाण्यामुळे नजरेसमोर उभा राहिल्याची भावना चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी व्यक्त केली. गाण्याचा मुखडा आपले काका शांताराम मापुसकर यांनी लिहिला असून मनोज यादव याने गाण्याचा अंतरा लिहिल्याची माहिती त्यांनी दिली. काकांनी लिहिलेल्या शब्दांना रोहन गोखले आणि रोहन प्रधान या जोडीने दिलेल्या संगीतामुळे या गाण्याची शोभा अधिक वाढल्याचे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.