प्रियांका चोप्रा काहीच दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आली. इतक्या दिवसांनी मायदेशी परतल्यावर ती थोडा आराम करेल असे वाटत होते. पण ती आरामाच्या मूडमध्ये नाहीये असंच वाटतंय. सध्या ती अंतराळात जाण्याच्या तयारीला लागली आहे.

प्रियांका पूर्णपणे वर्कोहोलिक आहे, असं प्रियांकाच्या आईनेही हे मान्य केलंय. तिला फार आराम करणं आवडत नाही. त्यामुळेच एकीकडे हॉलिवूडचे बिग बजेट प्रोजेक्ट करत असतानाही तिने हिंदीकडे पाठ फिरवली नाही. ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रीय झाली असून, सध्या ती चांगल्या संहितेच्या शोधात आहे. लवकरच प्रियांका, कल्पना चावलावर बनणाऱ्या आत्मचरित्रपटाचा हिस्सा बनू शकते, अशा चर्चा सध्या सिनेवर्तुळात रंगताना दिसत आहेत. तिने या प्रोजेक्टसाठी होकार दिल्याचेही स्पष्ट होते. या सिनेमात प्रियांका अंतराळवीर कल्पनाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. पण अजून प्रियांकाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी या प्रोजेक्टसाठी प्रियांकालाच पसंती देण्यात आली आहे हे जवळजवळ पक्क झालं आहे.

प्रिया मिश्रा या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. प्रिया सध्या कल्पना चावलाच्या कुटुंबियांना भेटून तिच्याबद्दल सखोल अभ्यास करतेय. प्रियांकाही तिच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून कल्पनाच्या कुटुंबियांना भेटणार असल्याचे बोलले जात आहे. याआधी प्रियांकाने मेरी कॉमच्या आत्मचरित्रपटात काम केले आहे. जर या प्रोजेक्टसाठी प्रियांकाने होकार दिला तर, आत्मचरित्रपटात काम करण्याची तिची ही दुसरी वेळ असेल.

सध्या बॉलिवूडमध्ये आत्मचरित्रपटांचेच वारे जास्त वाहताना दिसत आहेत. त्यातही अंतराळात जाण्यासाठी बॉलिवूड जरा जास्तच उत्सुक असल्याचे दिसते. प्रियांकाच्याआधी, आमिर खानही अंतराळवीर राकेश शर्मच्या आयुष्यावर बेतलेल्या एका सिनेमात काम करणार असल्याचे म्हटले जाते. आमिर, प्रियांका कमी की काय सुशांतसिंग राजपूतही ‘चंदा मामा दूर के’ या सिनेमातून अंतराळात जाणार आहे. साय-फाय प्रकारात मोडणाऱ्या या सिनेमात सुशांतसह नवाजुद्दीन सिद्दीकीचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.