क्वांटिको गर्ल प्रियांका चोप्राने तिच्या आगामी ‘बेवॉच’ या पहिल्यावहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या प्रसिद्धीला सरुवात केली आहे. या चित्रपटामध्ये प्रियांका व्हिक्टोरिया लीड्स या खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबतच यात जॅक इफ्रान आणि ड्वेन जॉन्सन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अमेरिकन मनोरंजन सृष्टीतील ‘क्वांटिको’ या मालिकेच्या माध्यमातून प्रियांकाने वेगळी छाप पाडली आहे. या मालिकेनंतर प्रियांकाची या चित्रपटासाठी वर्णी लागली. प्रियांकापूर्वी दीपिका पदुकोणचा पहिलावहिला चित्रपट चांगलाच प्रकाशझोतात आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता प्रियांका तिच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटातून भारतीय सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. आगामी चित्रपटाबद्दल प्रियांकाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे दिसते.

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रियांकाने काळ्या रंगाचा ड्रेस घातल्याचे दिसले. एवढेच नाही तर प्रसिद्धीवेळी प्रियांका भलतीच खूश असल्याचे पाहायला मिळाले. तिने चित्रपटातील सहकलाकार जॅक इफ्रान आणि ड्वेन जॉन्सन यांच्यासोबत खूप धम्माल करत प्रसिद्धीला सुरुवात केली. प्रियांकाने इन्स्टाग्राम अकांऊटवरुन चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती चित्रपटातील सहकलाकारांसोबत धम्माल करताना दिसत आहे. फोटोसोबतच तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये प्रियांका खुद्द तिच्या चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसते.