हिंदी चित्रपटसृष्टीत जम बसल्यांनतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा जास्त काळ भारताबाहेरच असते. संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्ये ‘काशीबाई’ची भूमिका साकारत प्रियांका एका मराठमोळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर आली होती. त्यानंतर मात्र बॉलिवूडमध्ये प्रियांका फारशी सक्रिय नव्हती असेच म्हणावे लागेल.
सध्या प्रियांका ‘क्वाटिंको २’ या मालिकेच्या निमित्ताने व्यस्त आहे. त्यामुळे बी टाऊनमध्ये होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रियांका फार कमीच दिसते हे खरे असले तरीही ती अभिनय क्षेत्रात मात्र ती सक्रिय आहे. ‘क्वाटिंको’च्या दुसऱ्या पर्वाची उत्सुकता पाहता या सिरीजचे आणखी पर्वही लवकरच येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका इंग्रजी मासिकाद्वारे प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जर ‘क्वाटिंको’ या सिरीजचे आणखी काही पर्व प्रियांकाच्या वाट्याला आले तर ती येत्या पाच वर्षांसाठी लॉस एंजलिसला (अमेरिकेत) स्थायिक होऊ शकते. जुलै महिन्यात ‘क्वाटिंको २’च्या निमित्ताने भारताबाहेर गेलेली प्रियांका थेट पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच भारतात परतण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे येणाऱ्या काही काळात बॉलिवूडमध्ये ‘पिसी’ कमीच झळकणार आहे.
‘क्वाटिंको’ या सिरीजच्या पहिल्या पर्वामुळे विदेशी प्रेक्षकांच्यामनावर छाप उमटवण्यात ही ‘देसी गर्ल’ यशस्वी झाली होती. आता पुन्हा प्रियांका गाजत आहे ती याच सिरीजच्या दुसऱ्या पर्वासाठी. ‘क्वांटिको’च्या पहिल्या सिझननंतर ‘क्वांटिको २’ मध्येही ती अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारणार आहे. नुकताचं ‘क्वॉटिको २’ टीझर प्रदर्शित करण्यात आला. या सिजनमध्ये प्रियांका चोप्रा आणि जॅक मॅकलाफलिन यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहावयास मिळू शकते. याव्यतिरीक्त यात जोहाना ब्रॅडी आणि यास्मिन अल मास्री यांच्याही भूमिका आहेत. ‘क्वाटिंको २’ शिवाय प्रियांका ‘बेवॉच’ या चित्रपटातही एका भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती हॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. यात अलेक्झांड्रा दद्दारिओ, इलफेनेश हॅडेरा आणि केली या अभिनेत्री तसेच ड्वेन जॉन्सन (रॉक), झॅक एफरॉन, जॉन बॅस हे कलाकारही झळकणार आहेत.