चित्रपटांना प्रमाणित करत त्यातील काही आक्षेपार्ह संवाद आणि दृश्यांना कात्री लावणाऱ्या सेन्सॉर बोर्डाने देसी गर्लच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटावरही कात्री चालवली आहे. ‘ए’ म्हणजेच अॅडल्ट सर्टिफिकेट देऊन प्रमाणित करत ‘देसी गर्ल’च्या या चित्रपटातील एकूण पाच दृश्यांवर कात्री चालवल्याचं म्हटलं जात आहे. ड्वेन जॉन्सन, झॅक अॅफ्रॉन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये प्रियांका खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. पण, सध्या सेन्सॉरचा पवित्रा पाहता त्यांनाही प्रियांकाचा हॉलिवूडपट काही रुचलेला नाही, असंच दिसत आहे.

‘बेवॉच’ला लावण्यात आलेल्या या कात्रीबद्दल सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटामध्ये प्रियांकाच्या कोणत्याही दृश्यावर कात्री लावली नसल्याचे निहलानी म्हणाले, ‘चित्रपटातील बिकीनी दृश्यांना कात्री लावण्यात आली नाहीये. कारण याआधीही काही अभिनेत्रींनी बिकिनी शॉट्स दिले आहेत.’ त्यासोबतच निहलानी यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांचं मत मांडलं आहे. ‘भारतीय चित्रपट निर्माते- दिग्दर्शकांनी बिकिनीच्या मुद्द्याला जास्त महत्त्व देणं टाळावं. त्याऐवजी त्यांनी मॉरिशस आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर जावं..’, असं ते म्हणाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बेवॉच’मधील एका दृश्यावर आणि चार संवादांना कात्री लावण्यात आली आहे. या चित्रपटातील फक्त काही आक्षेपार्ह संवादांवरच सेन्सॉरने हरकत दर्शवल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी आता प्रियांका तिचं मत मांडते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्यातरी ही ‘क्वांटिको गर्ल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. त्यासोबतच चित्रपट निर्मिती क्षेत्रातही ती विविध प्रयोग करत असल्याचं पाहायला मिळतंय. सिक्कीमी चित्रपट निर्मितीमध्येही प्रियांकाने पदार्पण केलं असून, तिची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरचं कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनावरण करण्यात आलं. पाखी ए. टायरवाला दिग्दर्शित या चित्रपटाच्या पोस्टरने सध्या बऱ्याचजणांचं लक्ष वेधलं आहे. ‘पाहुना’ असं नाव असणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरवर दोन लहान मुलं दिसत असून, त्यावर ‘पाहुना, लिटिल विजिटर्स’ असंही लिहिण्यात आलं आहे.

वाचा: ‘हिंदी-प्रादेशिक अशी विभागणी अयोग्य’