शाहरुख खानच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहरूखच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर तो रिलीज झाला आहे. राहुल ढोलकीया दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि गौरी खान यांनी केली आहे. अब्दुल लतिफ याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या जीवनावर या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. वेगळ्या अंदाजात आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावरही रईसचेच वारे वाहू लागले. विविध युट्यूब वाहिन्यांद्वारे या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यूही देण्यात आला. जवळपास सर्वांनाच या चित्रपटातील शाहरुखचा नवा अवतार आवडला असून या ट्रेलरमधील नवाझुद्दिन सिद्दिकिच्या भूमिकेचीही प्रशंसा केली जात आहे. त्यासोबतच या ट्रेलरमध्ये सनी लिओनीची झलक पाहून अनेकांना आश्चर्यच वाटत आहे.

‘अम्मीजान कहती थी कोई धंदा छोटा नही होता…और धंदे से बडा कोई धर्म नही होता’ या वजनदार वाक्याने या ट्रेलरची सुरुवात होत आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुखच्या काही अशा हालचाली दिसून येतात की, गुंडाची भूमिका करतानाही त्याच्या हळव्या मनाचे दर्शन घडून येते. गुंडाच्या भूमिकेत असणारा शाहरुख हळव्या मनाचा असल्याचे ट्रेलरमधील काही क्षणामध्ये दिसत असल्यामुळे या चित्रपटात गुंडामधील भावूक शाहरुख पाहायला मिळेल का असा प्रश्नही निर्माण होतो. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली थरारक दृश्ये, शाहरुखचा हटके, गॅंगस्टर लूक आणि त्याचे डायलॉग प्रेक्षकांचे आणि नेटिझन्सचे लक्ष वेधत आहेत. ‘रईस’च्या ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेले पार्श्वसंगीत आणि कलाकारांचे संवाद पाहता या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली असणार. ‘रईस’च्या ट्रेलरमध्ये अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकीच्या अभिनयाची झलकही पाहायला मिळत आहे. यासोबतच मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीही या चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. त्यामुळे किंग खानचा ‘रईस’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होणार असंच दिसतंय.

शाहरुख खान याच्या ‘रईस’मध्ये पाकिस्तानी माहिरा खान असल्यानुळे त्यावरून वाद पेटला होता. मनसेने पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला आहे. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडणार का? आणि या चित्रपटाच्या कमाईवर त्यांचा परिणाम होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.