सुपरस्टार रजनीकांतच्या ‘कबाली’ची सर्वत्र चर्चा असतानाच अमेरिकेत या चित्रपटाच्या एका खास प्रदर्शनादरम्यान चाहत्यांच्या अनंदाला काही पारावारच उरला नाही. खुद्द रजनीकांत यांनीच या ‘स्पेशल स्क्रिनिंग’ला भेट देत ‘कबाली’ पाहिल्यामुळे चित्रपट गृहात उपस्थित असणाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. ‘कबाली’या चित्रपटाची लोकप्रियता पाहता चाहत्यांनी यापूर्वीच काही धम्माल प्रसिद्धी तंत्रांचे अवलंबन करत सारे वातावरणच ‘कबाली’मय केले आहे.
सकाळी पाच वाजताचे शो हाऊसफुल्ल करत आणि सार्वजनिक सुट्टया जाहीर करत तर काही ठिकाणी कहरच करण्यात आला आहे. चाहत्यांचे हेच बेसुमार प्रेम पाहून अमेरिकेतील ‘सॅन फ्रॅन्सिस्को’ शहरातील काही भाग्यवान चाहत्यांसाठी चित्रपटाचे ‘स्पेशल स्क्रिनिंग’ करण्याचे योजले होते. अमेरिकेतील प्रेक्षकांनी ‘थलाइवा रजनी’च्या या चित्रपटाबद्दल ‘पैसा वसूल, अंगावर शहारे आणणारा’ चित्रपट अशा शब्दांत प्रतिक्रिया देत आणि टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद देत व्यक्त झाले. पायरसीमुळे ‘कबाली’च्या कमाईत तिळमात्रही फरक पडताना दिसत नसून याउलट ‘सुलतान’ आणि ‘बाहुबली’ या सुपरहीट चित्रपटांचे विक्रम रजनीकांतचा ‘कबाली’ हा चित्रपट मोडीत काढणार असा दावा चित्रपट निर्मात्यांनी केला आहे. पीए. रंजिथ दिग्दर्शित ‘कबाली’ या चित्रपटात रजनीकांत एका मलेशियन डॉनची भूमिका साकारत असून राधिका आपटे, किशोर, कलैरसन, धन्सिका, विन्सटन चाओ, दिनेश हे कलाकारसुद्धा या चित्रपटातून झळकणार आहेत. सर्वत्र ‘कबाली’चाच बोलबाला असल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान रजनीकांतने चाहत्यांना दिलेली ही अनोखी भेट सध्या प्रचंड चर्चेत असून यामुळे ‘कबाली फिव्हर’चा पारा आणखीनच चढला आहे. त्यामुळे आता ‘कबाली’ कोटीच्या कोटी उड्डाणे घेत इतर चित्रपटांना मागे टाकणार का हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.