फुकाचा वाद ओढवून घेण्यात बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असणारा निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा टीकेचा धनी ठरला आहे. यावेळी त्याने बॉलिवूड सिनेमांच्या दिग्दर्शकांवर उपरोधिक टीका केली आहे. यावेळी त्याने एस. एस. राजामौली यांच्या आगामी ‘बाहुबलीः द कनक्ल्युजन’ या सिनेमासंबंधी ट्विट केले. या सिनेमामुळे इंडस्ट्रीतील इतर दिग्दर्शक स्वतःला अपरिपक्व समजतील. रामूच्या उपरोधिक टीकेनंतर त्याच्यावर चहूकडून टीकांच्या तोफा डागल्या जात आहेत.

बाहुबलीचा दुसरा भाग येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारले, या उत्कंठावर्धक प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रश्नाच्या उत्तराची वाट बाहुबलीचे चाहते पाहत आहेत. आता काही दिवसांमध्येच त्यांना याही प्रश्नाचं उत्तर मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. हा सिनेमा भारतात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा सिनेमा भारतीय सिनेमांचे अनेक रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता आहे. हा सिनेमा जगभरात ९००० चित्रपटगृहांमध्ये तर भारतात सुमारे ६५०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करण्यात येणारा बाहुबली हा पहिलाचा भारतीय सिनेमा ठरेल.

बॉलिवूडचे सिनेमेही देशभरात जास्तीत जास्त ५००० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केले जातात. तर दक्षिणेकडील राज्यांत ३००० स्क्रिनवर तामिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम सिनेमे प्रदर्शित केले जातात. २८ एप्रिलला बाहुबलीसोबत कोणताही दुसरा बिग बजेट सिनेमा प्रदर्शित होत नाहीये, त्यामुळे सगळ्या थिएटर्समध्ये बाहुबलीचेच वर्चस्व पाहायला मिळेल यात काही शंका नाही. या सिनेमामध्ये अनुष्का शेट्टी, प्रभास, राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया, सत्यराज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यासोबतच सिनेमाच्या दुसऱ्या भागात अनुष्का शेट्टीच्या पात्रावरही विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ‘बाहुबली २’ या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एका भव्य साम्राज्याची सफर घडणार हे मात्र नक्की.