टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेता राम कपूरने पैसे थकवल्यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. कुलाबा येथील एका व्यावसायिकाकडून क्रेडिट कार्डचे बिल देण्यासाठी त्याने ३५ लाख रुपये उधारीवर घेतल्याचे म्हटले जातेय. मात्र, त्याने हे पैसे परत न केल्यामुळे व्यावसायिकाने कोर्टात धाव घेतली आहे.

वाचा : पाच वर्षांपूर्वी सैफच्या रिसेप्शन पार्टीत घातलेल्या त्याच ड्रेसमध्ये दिसली सारा!

निर्यातीचा व्यवसाय असलेल्या मावी बिझनेस वेंचर्स एलएलपीने २१ जून २०१७ रोजी रामच्या विरोधात पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली होती. अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डची थकीत रक्कम भरण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून त्याने आपल्याकडून पैसे घेतल्याचे मावी बिझनेसचे म्हणणे आहे. सुरुवातीला सर्व चौकशी केल्यानंतर कुलाबा पोलिसांनी सदर प्रकरण न्यायालयात नेण्याचा सल्ला मावी बिझनेसला दिला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये रामच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. मावी बिझनेस वेंचर्सचे वकील सिद्धार्थ श्रीवास्तव म्हणाले की, याप्रकरणाची फौजदारी तक्रार गेल्याच महिन्याच दाखल करण्यात आली होती.

याआधी रामला पैसे परत देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, तरीही त्याने पैसे परत न केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी रामला विचारले असता तो म्हणाला की, मला या प्रकरणावर कोणतीही टिप्पणी करायची नाही. पोलीस यासंबंधी सर्व चौकशी करत आहेत.

वाचा : ‘पद्मावती’ प्रदर्शित केल्यास चित्रपटगृहात जाळपोळ करू

एकता कपूरच्या ‘बडे अच्छे लगते है’ मालिकेने राम प्रसिद्धीच्या झोतात आला. यासाठी त्याला दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला होता. मालिकांसह त्याने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांमध्येही काम केलेय.