अभिनेता रणवीर सिंग आणि त्याच्या अनोखा अंदाज नेहमीच अनेकांची मनं जिंकतो. रणवीर फॅशन शोच्या रॅम्प पासून ते अगदी ट्विटरच्या पोस्ट्स करण्यापर्यंत चर्चेत असतो. सध्या स्वित्झर्लंडमध्ये धम्माल करणारा रणवीर सोशल मीडियावरच्या त्याच्या अतरंगी फोटोआणि व्हिडिओसाठी गाजत आहे. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन हटके फोटो शेअर करत रणवीर कामात व्यस्त असूनही त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे असेच म्हणावे लागेल.
काही दिवसांपूर्वीच किंग खानच्या ‘डर’ या चित्रपटातील ‘तु मेरे सामने’ या गाण्यावर अगदी शाहरुखच्याच अंदाजात नृत्य करत रणवीरने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याचीच पुनरावृत्ती करत आता रणवीरने पुन्हा एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानच्या चित्रपटातील गाणे गातानाचा व्हिडिओ रणवीरने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटातील ‘परदेसी परदेसी’ गाणे गाताना दिसत आहे. स्वित्झर्लंडच्या रम्य वातावरणात रणवीरचा हा मस्तीखोर अंदाज अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आणत आहे. अवघ्या काही काळातच प्रभावीपणे कामगिरी करत आणि विविध भूमिका साकारत रणवीरने बॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे असे म्हणायला हरकत नाही. ‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या पोस्टर्समुळे अभिनेता रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांची सध्या चित्रपट वर्तुळात प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि त्यातून झळकणारी वाणी व रणवीरची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. असे असतानाच रणवीर मात्र आणखी एका कारणाने सोशल मीडिया गाजवत आहे असेच म्हणावे लागेल.
रणवीरच्या बहुचर्चित ‘बेफिक्रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले असून ९ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.