एका मुलाखतीदरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटी होणं ही काही सोपी बाब नाही असे विधान अभिनेत्री रवीना टंडनने केले आहे. १९९१ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रवीनाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. विविध भूमिकांद्वारे रवीनाने चाहत्यांमध्ये तिचे स्थान बनवले आहे. एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये आघाडीवर असलेल्या रवीनाने ‘हिंदी चित्रपटांमध्ये महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे’, असे मत मांडले. आपले हे मत पटवून सांगताना रवीना म्हणाली ‘१९९० चे दशक हिंदी चित्रपटसृष्टीमधील बदलाचे दशक होते. तोपर्यंत भारतीय चित्रपटांमध्ये महिलांच्या बदलत्या परिस्थितींवर भाष्य करणारे चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यापैकीच एक चित्रपट होता, ‘शूल’.

कलाकारांच्या कुटुंबाशी नाते असणाऱ्या अनेकांना चित्रपटसृष्टीमध्ये अगदी सहज प्रवेश मिळतो असाच अनेकांचा समज आहे. पण हा समज मोडित काढत रवीना म्हणाली, ‘अशा ‘स्टार किड्स’ना त्याचे कर्तृत्व आणि त्यांची पात्रता सिद्ध करणाचं मोठं आवाहन असतं. त्यांच्यावर प्रेक्षकांचा दबाव, अपेक्षांचं ओझं असतं. त्यातही जर चित्रपट नाही चालला, तर ती गोष्ट वेगळीच तणावाची ठरते. लोक तुम्हाला आणखीन तुच्छ लेखू लागतात. कारण, इतरांना तर असेच वाटत असते की, तुम्हाला तर सगळं काही आयतंच मिळालं आहे’.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवीना बोलत होती. लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरवर परिणाम होतो असं मत असणाऱ्यांसाठी रवीना म्हणाली, ‘मी लग्नानंतरही चित्रपटांमध्ये काम करत होती. आता तर परिस्थितीमध्ये फार बदल आला आहे.’ रवीना २०१५ मध्ये अनुराग कश्यपच्या ‘बॉम्‍बे वेल्वेट’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर मात्र तिने रुपेरी पडद्यापासून दूर राहणंच पसंत केले होते. दरम्यान सध्या रवीना तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून लवकरच ती एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.