लैंगिक शोषणाविरोधात कल्की कोचलीन, विद्या बालन, मल्लिका दुआ यांसारख्या अभिनेत्रींनी आवाज उठवल्यानंतर आता रिचा चड्ढानेही तिचे मत मांडले आहे. सामाजिक मुद्द्यांवर बेधडकपणे बोलणाऱ्या रिचाने ‘मी टू’ #MeToo हॅशटॅगला पाठिंबा दर्शविला आहे. लैंगिक शोषणावर तिने एक ब्लॉग लिहिला असून यामध्ये केवळ भारतातच नाही तर जगभरात महिलांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर तिने भाष्य केले.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी टू’ अभियान सुरू आहे आणि हा हॅशटॅग वापरून जगभरातील महिला लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवत आहेत. रिचाने तिच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘सर्वांत आधी मी हे सांगेन की लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावरील मौखिक किंवा अन्य स्वरुपातील अभियान सुरूच ठेवला पाहिजे. मनासारखे कपडे घालण्याचे, कुठेही आणि कोणासोबतही फिरण्याचे स्वातंत्र्य पुरुषांना आहे. त्यांच्या चारित्र्यावर मात्र कधीच प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. ‘मी टू’ या मोहिमेत सहभागी होऊन महिला त्यांची व्यथा मांडत आहेत आणि त्यामुळे पुरुषांचा पक्ष झुकल्याने मला काहीच आश्चर्य वाटत नाही.’

वाचा : बोगस जन्मदाखला सादर केल्याचा आरोप करत धनुषविरोधात तक्रार 

‘लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये पीडित महिलांवरच प्रश्न उपस्थित केले जातात. समाजाने आरोपींना तुच्छतेची वागणूक दिली पाहिजे, पीडितांना नाही,’ असेही तिने म्हटले. समाजाच्या या दुटप्पी भूमिकेवरही तिने प्रश्न उपस्थित केले. रिचाने नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिचे मत ठामपणे मांडले आहे. महिलांची सुरक्षा, लैंगिक अत्याचार या मुद्द्यांवर ती बऱ्याच कार्यक्रमांमध्ये खुलेपणाने आपले विचार मांडत असते. हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वी विनस्टीनवर लैंगिक शोषणाचे आरोप अनेक अभिनेत्रींनी केले. त्यानंतरच सोशल मीडियावर ‘मी टू’ #MeToo हॅशटॅग अंतर्गत मोहीम सुरू झाली.