शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा दरवर्षी चर्चेतच अडकलेला विषय. या समस्येवर मार्ग काढण्याचे प्रकारही सगळे राजकीय विचारसरणीतूनच आलेले. अशा वातावरणात कर्जमुक्ती मिळवण्यापेक्षा देहमुक्तीचा मार्ग जवळ करणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात शिरून त्यातूनही वाट काढता येते, असं विश्वासार्ह चित्र रंगवणारा मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ला २०१५ साली सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा त्याच्यासह अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काही बसला आणि ज्यांनी तो चित्रपट पाहिला आहे त्यांना ती निवड सार्थही वाटली. मात्र राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर लागलेला हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी मध्ये दोन र्वष गेली आहेत. मानाचा पुरस्कार मिळवणारा चित्रपट आता कुठे लोकांपर्यंत पोहोचणार आहे.. खऱ्या अर्थाने ‘रिंगण’ पूर्ण होणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही प्रदर्शनासाठी योग्य निर्माता मिळेपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेणारा मकरंद.. या दोन वर्षांकडेही सकारात्मकतेने पाहतो. ‘रिंगण’ हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्याला पुरस्कार मिळेल याची कल्पना केली नव्हती. पण चित्रपट तयार झाला तेव्हा तो महोत्सवांमधून दाखवायचा, नंतर प्रदर्शित करायचा हे आधीच ठरेललं होतं. पण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चित्रच पालटलं. त्यानंतर अनेक छोटे-मोठे निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी संपर्कात आले. मात्र हा चित्रपट समजून घेऊन तो लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं तसा निर्माता मिळेपर्यंत आम्ही वाट पाहिली, असं सांगणाऱ्या मकरंदने आता या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी घेतलेल्या ‘लॅण्डमार्क फिल्म्स’च्या विधी कासलीवाल यांच्याबरोबरही आठ ते नऊ मीटिंग झाल्यानंतर ‘रिंगण’ अधिकृतरीत्या त्यांच्या बॅनरखाली आल्याची माहिती दिली. त्याच्या चित्रपटाचा कथाविषय जसा सकारात्मक तेकडे नेणारा आहे तसाच त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे ही दोन र्वष अवघड होती असं म्हणण्यापेक्षा ती खूप काही शिकवणारी होती, असं त्याने सांगितलं.

‘सुरुवातीला जेव्हा चित्रपटासाठी निर्माता मिळत नव्हता तेव्हा मीही खचलो होतो. पण इथे चित्रपटातील अर्जुन मगर आणि मी सारखेच आहोत असं मला वाटतं. तो जेव्हा आत्महत्येचा विचार सोडून मार्ग शोधायचं ठरवतो तेव्हा त्यात अडचणी येणार हे त्याने गृहीत धरलेलंच असतं पण तो प्रयत्न सोडत नाही. ‘रिंगण’ हा चित्रपट पूर्णपणे मी केला असल्याने तो प्रदर्शित करताना आलेल्या ज्या अडचणी आहेत, वितरणातले बारकावे आहेत ते मला समजले. मी कु ठल्या तरी कंपनीसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं असतं तर एवढं शिकू शकलो नसतो. त्यामुळे आता पुन्हा दुसऱ्या चित्रपटाच्या वेळी हे बारकावे मला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया दीर्घकालीन होती पण मजा आली, वेळ गेला असं वाटत नाही उलट माझं शिक्षण झालं,’ अशा शब्दांत त्याने आत्तापर्यंतचा निर्मात्यांच्या भेटी आणि त्यातून मिळालेले होकार-नकार पचवत इथपर्यंत येण्याचा त्याचा प्रवास उलगडून सांगितला.

‘रिंगण’च्या कथेला पंढरपूरची पाश्र्वभूमी आहे. त्याने पंढरपूरमधील वातावरण, वारी, विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे हजारो वारकरी, त्या निमित्ताने अगदी हळद-कुंकवापासून उभी राहिलेली बाजारपेठ असे अनेक तपशील देत त्याने अर्जुन-अभिमन्यू या बापलेकाचा संघर्ष रंगवला आहे. रोजच्या जगण्यातली अशक्यता बाजूला सारून ‘शक्य’ ते श्रद्धेने करण्याचा मंत्र देणारी ही कथा कोणाच्या अनुभवातून आलेली नाही, असं तो स्पष्ट करतो. मला अर्जुन मगरसारखी व्यक्ती कधी भेटलेली नाही. मी सोलापुरात लहानाचा मोठा झालो. शेतकऱ्यांचं आयुष्य मी जवळून पाहिलेलं आहे. ते अनुभव एकीक डे, मी काही र्वष लोणावळ्याला मनशक्ती प्रयोगकेंद्रात होतो तिथल्या विचारांचा प्रभाव, त्यानंतर पुण्यात ‘ललित केंद्रा’त प्रवेश घेतल्यानंतर तिथलं शिक्षण आणि जडणघडण यातून माझी विचारधारा अधिक निश्चित, दृढ होत गेली. त्याचा परिणाम अर्थातच कथालेखनात दिसतो, असं तो म्हणतो. या चित्रपटात अर्जुन मगर ही व्यक्तिरेखा साकारणारे आणि त्यासाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळवणाऱ्या अभिनेता शशांक शेंडे यांनीही अर्जुन ही व्यक्तिरेखा मकरंदने अनुभवलेली नाही, तर त्याने ती निर्माण केली असल्याने ती वेगळी उमटली आहे. कित्येकदा दिग्दर्शक स्वत:च्या आयुष्यातील अनुभव, व्यक्तिरेखा यांना कथेत उतरवून त्यावर चित्रपट करताना दिसतात. हा ट्रेंड खूप जास्त आहे. ‘रिंगण’ त्याबाबतीत वेगळा ठरतो कारण ते मकरंदने काहीएक विचाराने ती कथा, त्यातील व्यक्तिरेखा लिहिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

कलाकार म्हणून आपण ज्या चित्रपटाचा भाग आहोत तो प्रदर्शित होत नाही, खासकरून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट असेल तर ते दु:ख जास्त असतं. पण इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर खरं म्हणजे चित्रपट झाला की त्याच्याशी असलेलं भावनिक नातं संपवायचं याच निर्धाराने आपण वागत आलो आहोत. नाहीतर याचा खूप त्रास होतो, असं शेंडे यांनी सांगितलं. मात्र ‘रिंगण’च्या बाबतीत चित्रपटाच्या लेखन प्रक्रियेपासून मकरंदने मला सहभागी करून घेतलं होतं त्यामुळे या वेळी ते जोडलं जाणं जास्त असूनही या वेळी त्रास झाला नाही, असं सांगत त्याचं श्रेय त्यांनी दिग्दर्शक ज्या विश्वासाने ही प्रक्रिया पूर्ण करत होता त्याला दिलं. शेवटी परफॉर्मिग आर्ट्समध्ये करणारी बाजू जितकी महत्त्वाची असते तितकीच पाहणाऱ्याची बाजूही मोठी असते. त्यामुळे जोपर्यंत तुमची कलाकृती लोकांपर्यंत पोहोचत नाही तोवर ते ‘रिंगण’ पूर्ण होत नाही आणि कलाकारालाही समाधान मिळत नाही, असं त्यांनी सांगितलं. या चित्रपटात शशांक शेंडे आणि साहिल जोशी या लहानग्याची मुख्य भूमिका आहे. आजवर अव्यक्त आणि चित्रपटातून फार कमी वेळा रंगवलं गेलेलं बापलेकाचं नातं यात पाहायला मिळतं. साहिलचा वेगळा चेहरा आणि त्याचे बोलके डोळे या चित्रपटात किमया करून गेले आहेत. त्याच्याबरोबर काम करताना अभिनेता म्हणून इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर आलेला साचेबद्धपणा गळून पडल्याचं शशांक शेंडे यांनी सांगितलं. हा चित्रपट पंढरपुरात चित्रित झाला तेव्हा तिथे माघी यात्रा सुरू होती. लाखोंनी लोकं तिथे होती. त्यामुळे तिथल्या वातावरणाचा भंग न करता कधी छुपे कॅमेरे वापरून, वेगवेगळ्या पद्धतीने हे चित्रण पूर्ण करण्यात आल्याचं या दोघांनी सांगितलं. त्यामुळे आषाढीच्या मुहूर्तावर जेव्हा शेतकरीही त्यांच्या व्यापातून निवांत असतात आणि शहरातील प्रेक्षकही वेगळ्या वातावरणात असतो तेव्हा ‘रिंगण’ प्रदर्शित होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

प्रत्येक गावात असं एक भीतीचं झाड असतं..

वर्षभर हिरवं पीक फुलवण्यासाठी धडपडणारा शेतकरी आपल्या मृत्यूसाठी डेरेदार वृक्षाचीच निवड करतो हे कोडय़ात टाकणारं आहे, असं मकरंद सांगतो. खेडोपाडय़ात असं गावाबाहेर एकतरी भीतीचं झाड असतं की.. अरे, आज कोणाचा देह इथे लटकताना दिसणार तर नाही, ही भीती गावकऱ्यांच्या मनात असते. कित्येकदा हे झाड दूर टेकडीवर असतं जिथून पूर्ण गाव दिसतं. अत्यंत निराशेची छाया या झाडाभोवती असते हे स्वत: अनुभवल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे या चित्रपटातही झाडाचा प्रतिकात्मक वापर केला असल्याचं त्याने सांगितलं.