सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणातील चित्रपट ‘केदारनाथ’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूतही दिसणार आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या सत्रातील शूटिंगही पूर्ण झाले आहे. पण, आतापासूनच सारा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. आतापासूनच तिचा एक चाहतावर्ग निर्माण झाला असून तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशातच साराने तिच्या करिअरविषयी एक मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय.

‘केदारनाथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याशिवाय दुसऱ्या चित्रपटाचा विचारसुद्धा करणार नसल्याचं तिने ठरवलं आहे. पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कशाप्रकारे प्रतिसाद मिळतोय, हे पाहिल्यानंतरच ती पुढचा निर्णय घेणार आहे. साराची आई अमृता सिंगचाही हाच विचार आहे. पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच साराकडे बरेच ऑफर्स आले असल्याची माहिती मिळतेय. मात्र, प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहिल्यानंतरच साराने या क्षेत्रात पुढे जावं की नाही याचा निर्णय अमृता घेणार आहे.

वाचा : कंगनाला मिळाली आमिरची साथ

अमृता सुरुवातीपासूनच साराच्या करिअरविषयी प्रत्येक निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळालं. साराच्या पदार्पणाविषयीही सावध पावलं टाकली गेली. साराच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच जर हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही तर सारा अभिनय क्षेत्रातून माघार घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.