सोनू निगमच्या ट्विटवरुन देशभरात अजानचा मुद्दा चर्चेला आला आहे. मशिदीवरील मोठ्या आवाजात होणाऱ्या अजानवरून वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना बॉलिवूडचा नवाब सैफ अली खाननेही आपले मत मांडले आहे. अल्पसंख्यांक असल्यामुळे आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी मोठ्या आवाजाने लक्ष वेधावे लागते, असे सैफ म्हणाला. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या कार्यक्रमात सैफ म्हणाला की, ‘मी दोन्ही बाजू चांगल्या प्रकारे समजतो. एका बाजूला अजानवेळी लाउड स्पिकरचा आवाज हा कमी असावा या विधानाशी मी सहमत आहे.

पण, मला याचीही जाणीव आहे की, अजानच्यावेळी मोठ्या स्वरुपात निर्माण केला जाणारा आवाज हा असुरक्षिततेच्या भावनेमुळे निर्माण होतो. आपल्या देशातच नव्हे, तर जगभरात सर्वत्रच ही परिस्थिती आहे.’ यावेळी त्याने इस्रायलचा दाखला दिला. या देशात तीन धर्माचे लोक राहतात, याठिकाणी देखील अजान लाउडस्पीकरनेच केली जाते. सैफच्या मते, अल्पसंख्याक अजानच्या माध्यमातून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. ते फक्त अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी नाही, तर त्यांना स्वीकार करण्यासाठी हे सर्व करत असतात. त्यामुळे या परिस्थितीत अजानसंदर्भातील आवाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, तर काहींच्या भावना उग्र होणे स्वाभाविक आहे. अजानवेळी लाउड स्पीकरच्या आवाजाने त्रास होत असल्याचे ट्विट सोनू निगमने केले होते. त्याच्या या ट्विटनंतर अजानचा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर सोनूने  अजानचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच ‘गुड मॉर्निंग इंडिया’ असं ट्विट केलं आहे. त्याच्या या ट्विटचीही चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

सैफ अली खान ‘रंगून’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शाहिद कपूर आणि कंगना रणौतसोबतचा त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी सैफच्या मुलाच्या नावाची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. सैफने आपल्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यामुळेही वाद निर्माण झाला होता. छोट्या नवाबाच्या नावासंदर्भात रंगलेल्या तर्कवितर्कावर सैफने त्यावेळी खुलासाही केला होता.