मराठी चित्रपट आणि मी एक दुजे के लिए नाही, असा मी कधीच समज करुन घेतला नाही. याच कारण व्ही. शांताराम ज्या मातीत जन्मले त्या मातीतला गंध माझ्याही वाट्याला यावा, हा स्वार्थ माझ्या मनात फुलला होता. मराठीत झगमग नाही. तोकड्या कपड्यांची क्रेझ नाही, यामुळे माझी इच्छा अपुरी राहते की काय, असा विचारही अनेकदा मनात यायचा. याचवेळी मला मराठी माणूस आपली भाषा सोडून बॉलिवूडकडे झुकत असल्याचा रागही यायचा. आपल्या माणसाला मोठं करायला ही मंडळी का कचरतात, असा प्रश्नही पडायचा. मग मराठी माणूस खेकड्याच्या जातीचा असल्याच्या म्हणीच्या साह्याने मी बॉलिवूडच्या कलाकृतीला सलाम करायचो. पण मागच्या वर्षी नावाप्रमाणे ‘सैराट’ने कमाल केली. माझा मराठीवरील विश्वास फळाला आला. नागराजच्या चित्रपटाला मिळालेलं यशाचं कौतुक खास यासाठीच.

पूर्वीच्या काळात थिएटरबाहेर चित्रपटाच्या तिकिटासाठी लागलेल्या रांगेपेक्षा तो चित्रपट किती दिवस थिएटरमध्ये राहतोय, या गणितावर चित्रपटाचे यश अवलंबून असायचं. यात ‘पिंजरा’, ‘सामना’ आणि ‘सिंहासन’ या चित्रपटांनी मराठीतील दम दाखवून दिला. पण कमी दिवसांत अधिक पैसा कमविण्याच्या समीकरणात मराठीचा कुठंतरी गुंता झाला. ‘दुनियादारी’नं कोटीच्या घरात मजल मारली. अन् मराठी चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या सक्षम झाला. मराठीत कोट्यवधीची उलाढाल करणारे चित्रपट तसे हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. दुनियादारीनंतर नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या भारदस्त आवाजाने सजलेल्या ‘नटसम्राटट’ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. हा सिनेमा दुनियादारीपेक्षा वरचढ ठरला. अन् मला मराठीला ‘अच्छे दिन’ आल्याचे संकेत मिळाले.

नागराज मंजुळे हा व्यावसायिक चित्रपटाच्या रेसमधील घोडा नसल्याची मला तशी थोडी फार कल्पना होती. त्यात त्याच्या चिल्लर फॅक्टरीकडे पाहिल्यानंतर हा चित्रपट माझ्या अपेक्षांना पुरुन उरेल, असे कधीच वाटले नव्हते. पण या चित्रपटाने माझा अंदाज खोटा ठरवत दमदार कमाई केली. आर्ची परश्यानं लावलेल्या याडानं मी मनोमन फारच सुखावलो. आज या कलाकृतीला वर्ष होतंय. ‘सैराट’ चित्रपटाच्या यशानं मी सुखावलो हे जरी खरं असलं तरी सरतेशेवटी एक खंत मात्र राहुनच गेली. ती म्हणजे सैराट चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचू शकला नाही. क्रिकेटमध्ये नर्व्हस नाईंटी नावाचा प्रकार असतो. तो पटकन माझ्या मनात आला. एखाद्या खेळाडूने नव्वदीचा आकडा पार करावा आणि शतकापूर्वीच बाद व्हावा, अशी काहीशी परिस्थिती मला क्रिकेटच्या खेळानं सुरुवात झालेल्या ‘सैराट’च्या कमाईबद्दल वाटली. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू जरी नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला तरी मन हेलावून जातं. मग देशभरातील तमाम प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या ‘सैराट’च्या नर्व्हस नाईंटीची सल मनाला बोचत राहणारच ना!!!
– बॉक्स ऑफिसच्या मनातलं…