करण जोहरने आपला चाहता कलाकार शाहरुखसोबत कॉफी घेतल्यानंतर आपल्या बहुचर्चित कार्यक्रमाच्या १०० व्या भागात दबंग खानला निमंत्रण दिले होते. ‘कॉफी विथ करण’च्या पाचव्या सत्रात या कार्यक्रमाचे एकूण १०० भाग पूर्ण होणार आहेत. यासाठी या भागात दबंग सलमान खान, भाऊ अरबाज आणि सोहेल खानसोबत सहभागी झाला होता. ‘कॉफी विथ करण’चा १०० वा भाग रविवारी प्रदर्शित होणार आहे. करणच्या या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी होत असतात. करण पाहुण्या कलाकारांसोबत कॉफीच्या बहाण्याने अनेक गुपितांचा खुलासा करणारे खोचक प्रश्न त्यांना विचारत असतो. नेहमी प्रमाणेच या भागातदेखील सलमान खान काही खुलासे करणार आहे. सलमानने या कार्यक्रमात स्वत:विषयीचे धक्कादायक गुपित उलगडल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
सलमान खान कतरिनाचे नाव घेण्यासाठी कधीही लाजताना दिसत नाही. याची झलक सलमानने या कार्यक्रमात दाखवून दिली. करणने अरबाजला आवडत्या अभिनेत्रींची नावे सांगण्यास सांगितले होते. यावेळी अरबाजला मध्येच थांबवून सलमानने कतरिना कैफचे नाव घेतले. एक नंबरपासून ते पाच नंबरपर्यंत अरबाजच्या यादीत फक्त कतरिना कैफ असल्याचे सलमानने सांगितले. एवढेच सांगून सलमाना शांत बसला नाही. सलमानने या कार्यक्रमात चिकनी चमेली गाण्यावर ठेका धरत नाचताना दिसला. सलमानने केलेल्या कतरिनाच्या डान्सची नक्कल सोहेल खानने आक्षेप घेतला. तुला हा डान्स करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत सोहेलने सलमानला रोखले.
त्यानंतर सलमानने आपले एक असे गुपित उघड केले की, ते ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हे कदाचित समजणार नाही. सलमानने कार्यक्रमात सोहेल आणि अरबाज आम्ही तिघे भाऊ एकमेकांचे अंर्तवस्त्रही शेअर करत असल्याचे कबुल केले.
करणच्या या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांच्या अनेक रहस्यांवरील पडदा उघडला जातो. मागील आठवड्यात झालेल्या परिणीती चोप्रा आणि आदित्य रॉय कपूर यांची करणने फिरकी घेतली होती. या कार्यक्रमावेळीदेखील रंजक गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या. परिणीतीने ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मनिष शर्मा जवळचा मित्र असल्याचे कबुल केले होते. परिणीतीने या कार्यक्रमात एखाद्या अभिनेत्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी परिणितीने वरुणसोबत प्रेम आणि द्वेष असा संबंध असल्याचेदेखील सांगितले होते.