बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा ‘भूमी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. पण या सिनेमाचे चित्रीकरण जेव्हा संपले तेव्हाच दिग्दर्शक ओमंग कुमारने त्याच्या ‘द गुड महाराजा’ या दुसऱ्या सिनेमातही संजय दत्त असल्याची घोषणा केली होती. पण आता संजय या सिनेमात काम करणार नसल्याचे बोलले जात आहे. ‘द गुड महाराजा’ हा एक ऐतिहासिक सिनेमा असणार आहे. सिनेमाची कथा नवानगरचा राजा याच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात पारतंत्र्यातला काळ दाखवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील संजयचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला होता.

‘डीएनए’ने प्रदर्शित केलेल्या वृत्तानुसार, स्वतः संजयनेच या सिनेमातून काढता पाय घेतला आहे. संजयला ‘भूमी’ सिनेमाकडून फार अपेक्षा होत्या. पण सिनेमाने अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे चाहत्यांसोबत संजयचीही निराशा झाली. यामुळेच तो आता पुन्हा ओमंगसोबत काम करणार इच्छुक नाहीये.

संजयचे या सिनेमाला नकार देण्याचे अजून एक कारण म्हणजे हा सिनेमा कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. नवानगरचे (जामनगर) महाराजा जाम साहिब दिग्विजय सिंह आणि रंजित सिंह यांच्या पूर्वजांच्या परवानगीशिवाय सिनेमाची निर्मिती करण्याप्रकरणी दिग्दर्शक ओमंग कुमार, निर्माते आणि स्टुडिओला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

सध्या संजय ‘साहिब, बीवी और गैंगस्टर ३’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमाव्यतिरिक्त तो त्याच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या सिनेमाच्या कामातही लक्ष देत आहेत. ‘प्रस्थानम’ या मल्याळम सिनेमाचा रिमेक असणार आहे. पण या सिनेमाच्या चित्रीकरणाआधी संजय ‘तोबाज’ या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. या सिनेमात तो एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.