सोशल साइट्सवर सतत काही ना काही टाकून अपडेट राहायची सवय अनेकांना असते. स्वतःची प्रसिद्धी करण्याचाच तो एक भाग आहे. या तंत्रज्ञानाच्या दुनियेत आपले कलाकार तरी कसे मागे राहतील. कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर टाकून आपल्या फॅन्सना अपडेट ठेवण्याचं काम ते न चुकता करत असतात. त्यात सिनेमाच्या प्रमोशनचे फोटो असो किंवा कुटुंबाबरोबर सुट्ट्यांसाठी गेलेले फोटो.. प्रत्येक गोष्ट आपल्या फॅन्सपर्यंत पोहचवण्याचे काम ते करत असतात.
प्रत्येक कलाकार सोशल नेटवर्किंग साइटवर आपलं अकाउंट सुरु करतो. पण त्यांचे फॅन्सही त्याच नावाने अनेक अकाउंट बनवतात. त्यामुळे खरे कोणते आणि खोटे कोणते हे त्यांच्या चाहत्यांना कळतच नाही. पण ट्विटरवर तुम्ही ठराविक फॉलोअर्सचा आकडा पार केला तर ट्विटरकडूनच तुमचे अकाउंट व्हेरिफाय होते. यामुळे कलाकारांचे खरे अकाउंट कोणते याची माहिती त्यांच्या चाहत्यांना मिळते. नुकतीच मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि दिग्दर्शक संजय जाधव यांचे ट्विटर व्हेरिफाय झाले आहे. ट्विटरकडून अकाउंट व्हेरिफाय होणारा संजय जाधव हा पहिला मराठी दिग्दर्शक आहे. संजय आणि उर्मिलाचे अकाउंट अधिकृत झाले आहे.
आता संजय आणि उर्मिला दोघांच्याही अकाउंटवर ब्ल्यू टिक असणार आहे. यामुळे त्यांचे दोघांचे ट्विटर अकाउंट शोधणे त्यांच्या चाहत्यांना सोपे जाणार आहे. आतापर्यंत मराठई सेलिब्रिटींमध्ये स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांचे ट्विटर अकाउंट अधिकृत झाले आहेत.
आजपासून उर्मिलाची अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रावर नवी मालिका कलर्सवर येणार आहे. महेश कोठारे हे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहे. कोठारे प्रोडक्शनची निर्मिती असलेली ही मालिका सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी ९.३० वाजता पाहता येणार आहे.