‘पद्मावती’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता चांगलेच तयारीला लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या कथानकाची गरज पाहता संजय लीला भन्साळी या चित्रपटाबाबत जास्तच काळजी घेत आहेत. एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये अल्लाउद्दीन खिलजी, राणी पद्मावती, मेवाडचे राणा रतन सिंग यांच्या व्यक्तिरेखा साकारण्यात येणार आहेत. त्यामुळे या पात्रांशी निगडीत सर्व संशोधन करण्याकडे भन्साळींचा कल आहे. ‘बा़जीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या वेळी उद्भवलेल्या काही अनावश्यक वादांची चर्चा पाहता त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संजय लीला भन्साळी ही काळजी घेत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये १३ ते १४ व्या शतकातील चित्रण साकारण्यात येणार आहे. त्यामुळे त्या काळची मेवाडची समृद्ध संस्कृती पाहता त्यावर जास्त लक्ष केंद्रित येत आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या रुपाने पुन्हा एका रंजक ऐतिहासिक काळाचा आणि कथानकाचा उलगडा होणार आहे. येणाऱ्या काळात ‘पद्मावती’चे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून या चित्रपटात ऐतिहासिक काळाच्या पार्श्वभूमीचा आधार घेत संजय लीला भन्साळी अल्लाउद्दीन खिलजी आणि मेवाडची राणी पद्मावती यांच्याशी निगडीत कथानकावर चित्रपट साकारत आहेत. शाहरुख खान, फवाद खान यांच्या नावांची चर्चा असतानाच अभिनेता शाहिद कपूर या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटातील भूमिकेसाठी शाहिदने त्याच्या लूक्सवर मेहेनत घ्यायला सुरुवात केल्याचे कळत आहे. त्यामुळे ‘पद्मावती’च्या निमित्ताने सिनेरसिकांना शाहिद आणि दीपिकाच्या रुपात एका नव्या जोडीला एकत्र पाहण्याची संधी मिळेल.