बॉलिवूडमध्ये ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या रुपाने पुन्हा एका रंजक ऐतिहासिक काळाचा आणि कथानकाचा उलगडा होणार आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठ्यांच्या इतिहासाचे एक पान सिनेरसिकांसमोर सादर करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पद्मावतीचा पती, चित्तोढचा राजा रावल रतन सिंगची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. दीपिकाप्रमाणेच शाहिदलाही या भूमिकेसाठी चांगले मानधन मिळणार आहे अशी माहिती मिळत असून चित्रपटातील भूमिकेसाठी शाहिदने त्याच्या लूक्सवर मेहेनत घ्यायला सुरुवात केल्याचे कळत आहे.

या ऐतिहासिक चित्रपटातील राजाची भूमिका साकरणारा शाहिद शारिरिक मेहनत घेताना दिसत आहे. वर्कआऊटसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे शाहिदने चक्क आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कसरतीची सुविधा उपलब्ध केली आहे. अर्थातच चित्रपटासाठी शाहिद सध्या चालत्या फिरत्या व्हॅनला जीमचे स्वरुप दिले आहे. अभिनेत्री आलिया भट्टसोबत उडता पंजाब या चित्रपटातील दमदार भूमिकेनंतर पद्मावतीच्या पतीच्या भूमिकेसाठी शाहिद घाम गाळताना दिसत आहे. दीपिकाच्या नृत्य अविष्काराने या चित्रपटाच्या चित्रिकरणाला राजस्थानमधून सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, या चित्रपटाबाबतची गोपनियता ठेवण्यासाठी प्रयत्न करुन देखील रणवीरने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये रणवीरची लाल रंगाची नजर दिसली होती. या पोस्टनंतर सिनेचाहते पद्मावतीच्या अधिकृत फर्स्ट लूकच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटावर मोठ्या प्रमाणात खर्च केला असून या चित्रपटाकडून दिग्दर्शकासह मुख्य भूमिकेतील कलाकारांना अधिक अपेक्षा आहेत.

संजल लीला भन्साळी त्यांच्या चित्रपटाशी निगडीत छोट्या-छोट्या गोष्टींवरदेखील बारीक लक्ष देऊन असतात हे तर सगळेच जाणतात. ‘घुमर…’ हे चित्रपटातील पहिलेवहिले चित्रित झालेले गाण्यामध्ये याची प्रचिती देखील आली. या गाण्यातील ध्वनी, दृश्यं आणि सेटसह अनेक बारीकसारीक गोष्टींवर संजय लीला भन्साळी जातीने लक्ष ठेवले होते. राजेशाही अनुभव देणाऱ्या या गाण्याचा लूकदेखील उत्कृष्ट असल्याची चर्ची बॉलिवूड जगतामध्ये रंगली होती. संजय लीला भन्साळींचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘वायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ आणि ‘भन्साली प्रोडक्शन’ची निर्मिती असलेला हा चित्रपट पुढील वर्षी १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.