२०१२ मध्ये आलेला ‘इशकजादे’ सिनेमातील ‘परेशान’ गाण्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या या गायिकेचे संपूर्ण विश्वात अनेक फॅन्स आहेत. या गायिकेचं नाव आहे शाल्मली खोलगडे.
शाल्मली खोलगडेच्या आवाजाचे चाहते तर अनेकजण आहेत. रॉकस्टारची इमेज असलेल्या शाल्मलीची तरुणाईमध्ये सगळ्यात जास्त क्रेझ आहे. बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींना तिने आपला आवाज दिला आहे. यात परिणीती चोप्रा, राणी मुखर्जी, जॅकलिन फर्नांडिस, दीपिका पदुकोन यांसारख्या अभिनेत्रींना तिने आपला आवाज दिला आहे.
तिच्या या चाहत्यांमध्ये आता अजून एका चाहत्याची भर पडली आहे. ती म्हणजे जितेंद्र जोशीची. जितेंद्रला शाल्मलीची गाणी आवडतात असे त्याने सोशल नेटवर्किंग साइटवर म्हटले होते. नुकतीच शाल्मली तिच्या आईसोबत जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक यांच्या ‘दोन स्पेशल’ हे नाटक पाहायला गेले होते. शाल्मली आपले नाटक पाहायला आली हे जेव्हा जितेंद्रला कळले तेव्हा तो भलताच खुश झाला होता. आता त्याची आवडती गायिका त्याचा प्रयोग बघायला आली म्हटल्यावर तो प्रयोग जितेंद्रसाठी चांगलाच लक्षात राहणार.
प्रयोगानंतर जितेंद्रने शाल्मली खोलगडेसोबत ‘फॅन मुमेन्ट’वाले फोटो काढले. त्याने तिच्यासोबतचे हे फोटो ट्विटरवर शेअर केले. तर शाल्मलीनेही ‘दोन स्पेशल’ नाटकाच्या कलाकारांसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. जसा जितेंद्र जोशी तिच्या गायकीचा फॅन आहे त्याचप्रमाणे तीही त्याच्या अभिनयाची फॅन बनली. तिने ‘या क्षणापासून येणाऱ्या बऱ्याच काळासाठी तुम्ही माझे प्रेरणास्तोत्र असाल.’ असे ट्विट केले. या नाटकाच्या प्रयोगाला या ‘दोन स्पेशल’ व्यक्तींची भेट त्यांना कायमस्वरुपी लक्षात राहील यात काही शंका नाही.