अजय देवगणचा बहुचर्चित सिनेमा ‘शिवाय’ नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये अजयने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता अशी तिहेरी भूमिका साकारली होती. अजयच्या या शिवाय सिनेमासोबत करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. ‘शिवाय’च्या पहिल्या दिवसाची कमाई ही शहिदांच्या कुटुंबियांना दिली जाणार असल्याची घोषणा अजयने याआधीच केली होती. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती गल्ला कमवतो हे पाहणे सध्या उत्सुकतेचे ठरत आहे.

संपूर्णपणे बल्गेरियाच्या पर्वतराजींमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे. दिग्दर्शक म्हणून कलाकारांना घेऊन बर्फाळ पर्वतांमध्ये चित्रीकरण करणे हे आव्हान होते. आणि त्यासाठी गेले दीड-दोन वर्षे अजयची टीम अथकपणे काम करत होती. अजयचा सिनेमा असल्याने तो अ‍ॅक्शनपट आहे. त्याचवेळी गुंतागुंतीची कौटुंबिक कथाही त्याला जोडली आहे. यात अजयबरोबर साएशा सैगल ही नवोदित अभिनेत्री काम करत असून एरिका कार या पोलिश अभिनेत्रीचीही सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. अजयच्या मुलीच्या भूमिकेत एबीगेल एम्स ही हॉलीवूडची बालकलाकार काम करताना दिसणार आहे. या सिनेमाची सगळी मदार अर्थातच अजय देवगणवर आहे.

दरम्यान, ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रमोशनानंतर कमाल खानने अजय देवगणची मुख्य भूमिका असणारा ‘शिवाय’ सिनेमा लिक केल्याचे समोर आले होते. कमाल खानने आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन ‘शिवाय’ सिनेमाची लिंक शेअर करुन हा चित्रपट नक्की पाहा असे आवाहन सिनेरसिकांना केले होते. प्रदर्शनापूर्वी सिनेमाची लिंक देऊन कायद्याचे उल्लंघन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने ट्विटरवरुन ही पोस्ट काढून टाकली.