गँगस्टरचे जीवन हे धक्कादायक आणि रोमांचकारी घटनांनी भरलेले असल्याने हा विषय नेहमीच चित्रपटसृष्टीच्या जवळचा राहिला आहे. परिणामी या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले. इतकेच नव्हे तर अनेक चित्रपटांत गँगस्टरला हिरोपण बहाल करण्यात आले. हे योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. याच चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. ‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ नावाच्या या आगामी चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर गुन्हेगारी जगतातील ‘गॉडमदर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हसीना पारकरची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी अशी भूमिका श्रद्धा साकारत असून तिने या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ चित्रपटातील श्रद्धाचा लूक नक्कीच तिच्या चाहत्यांना थक्क करणारा आहे. आजपर्यंत ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी श्रद्धा यात डीग्लॅम लूकमध्ये दिसतेच. पण, त्याचसोबत तिच्या चेहऱ्यावरील भाव लक्षवेधक आहेत. तिच्या चेहऱ्यावर दिसणारा रागीट भाव पाहता हसीना किती सामर्थ्यवान होती याचा अंदाज येतो. तरुण हसीना ते गुन्हेगारी जगतातील गॉडमदर असे तिचे दोन लूक यात दिसून येतात. हसीना पारकर ही दाऊद इब्राहिमची बहिण होती. २०१४ मध्ये तिचे निधन झाले. ती दाऊदच्यावतीने मुंबईतील त्याच्या गुन्हेगारी विश्वाचा कारभार पाहायची, असे सांगितले जाते. या चित्रपटात श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर हादेखील काम करत असून तो यात दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत झळकेल. पहिल्यांदाच एक रिअल लाइफ भाऊ-बहिणीची जोडी रिल लाइफमध्येही एकत्र दिसणार आहे.

‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ च्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये आणखी एक स्त्रीप्रधान चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील श्रद्धाचा लूक हा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बेगम जान’मधील विद्याची आठवण करून देतो. पण, ही खंबीर भूमिका साकारण्यात श्रद्धाला यश येईल का? हे १४ जुलैला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.